संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्याने ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’च्या कार्यकर्त्यांसह दीड सहस्र जणांवर गुन्हे नोंद !

बेळगाव – बेळगाव पोलिसांनी अनुमती नाकारलेली असतांनाही १ नोव्हेंबरला निषेधफेरी काढणे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्याविषयी ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’चे १८ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दीड सहस्र मराठी भाषिक यांवर मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या संदर्भात उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले, ‘‘बेळगावात १ नोव्हेंबरला मराठी बांधवांवर कानडी सरकारने संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्याने गुन्हे नोंद केले असले, तरी शिवसेना नेहमीच मराठी बांधवांच्या पाठिशी होती आणि राहील. सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असतांना अशा प्रकारे गुन्हे नोंद करणे लोकशाही राष्ट्रात निषेधार्ह आहे.’’