चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग ‘जी-२०’ परिषदेसाठी भारतात न येण्याची शक्यता

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग

नवी देहली – येथे ९ आणि १० सप्टेंबरला होणार्‍या जी-२० परिषदेच्या बैठकीला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन उपस्थित रहाणार नसल्याचे त्यांनी यापूर्वीच कळवले असतांना आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हेही या बैठकीला उपस्थित रहाणार नसल्याची शक्यता आहे. अद्याप याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. शी जिनपिंग यांच्याजागी चीनचे पंतप्रधान ली क्वांग येणार असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी यापूर्वीच ते बैठकीसाठी येत असल्याचे कळवले आहे.

या बैठकीमध्ये दक्षिण आशियातील पालटती समीकरणे, भारत-चीन संबंध, रशिया-युक्रेन युद्ध अशा अनेक महत्त्वाच्या सूत्रांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. चीनच्या परराष्ट्र विभागाने नुकत्याच प्रसारित केलेल्या चीनच्या मानचित्रात (नकाशात) अक्साई चीन, लडाख आणि अरुणाचल प्रदेश चीनमध्ये दाखवल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांना खोडा घातला गेला आहे. या पार्श्‍वभूमीवर शी जिनपिंग यांनी बैठकीसाठी उपस्थित न रहाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.