
वेलिंग्टन – न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस हिपकिन्स यांनी भारतीय समुदायासमवेत होळीच्या उत्सवात सहभाग घेतला. पंतप्रधान क्रिस हिपकिन्स यांचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला असून ते भारतीय समुदायासमवेत होळी साजरी करतांना आनंदाने नाचतांना दिसत आहेत. गळ्यात फुलांचा हार, चेहर्यावर गुलाल आणि हातातील सिलिंडरमधून रंग उडवत असलेले त्यांचे दृश्य सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे ठरले.
या विशेष होळी कार्यक्रमात न्यूझीलंडमध्ये रहाणार्या भारतीय समुदायातील सहस्रो लोकांनी सहभाग घेतला. या वेळी गुलाल उधळण्यात आला आणि लोकांनी भारतीय संगीताच्या तालावर नाचत आनंद व्यक्त केला. न्यूझीलंडमध्ये मोठ्या संख्येने भारतीय वंशाचे लोक रहातात आणि प्रतिवर्षी तेथे भव्य होळी उत्सवाचे आयोजन केले जाते. न्यूझीलंडचे नेते याआधीही अनेकदा होळीच्या उत्सवात सहभागी झाले आहेत; परंतु या वेळी पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स यांनी स्वतः होळी खेळून भारतीय समुदायाला आश्चर्यचकित केले.