सिंहगड रस्त्यावरील ‘नंबरप्लेट’ बसवणारी २ केंद्रे अचानक बंद झाल्याने वाहनधारकांना त्रास !

पुणे – शासनाच्या नवीन नियमानुसार वाहनांना नवीन ‘नंबरप्लेट’ बसवणे अनिवार्य आहे; मात्र नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रोड) २ सुरक्षा क्रमांक प्लेट बसवणारी केंद्रे अचानक बंद झाल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या वाहनधारकांना नवीन केंद्राचे ठिकाण अद्याप समजलेले नाही. नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला असून ‘हेल्पलाईन’वर संपर्क साधल्यावर २ दिवसांत नवीन केंद्राची माहिती मिळण्याचे आश्वासन मिळते. (केंद्र देण्याच्या निर्णयासाठी नागरिकांना २ दिवस वाट का पहावी लागत आहे ? – संपादक) या वाहनधारकांना दुसर्‍या ठिकाणी सुरक्षा नंबरप्लेट बसवण्यासाठी जावे लागणार आहे; परंतु ते ठिकाण कोठे असेल ? याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

पुण्यात २५ लाख वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. त्या तुलनेत केंद्रांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे आस्थापनाने तातडीने ही केंद्रे वाढवावीत, अशी सूचना प्रादेशिक परिवहन विभागाने संबंधित आस्थापनाला केली आहे.

संपादकीय भूमिका 

नागरिकांना सहन कराव्या लागलेल्या त्रासाचे दायित्व स्वीकारून प्रशासन तातडीने काही उपाययोजना करणार का ?