अत्याधुनिक स्वयंपाकघर सुविधेचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
पणजी, १५ मार्च (वार्ता.) – गोव्यात पहिल्यांदाच ‘अक्षय पात्र फाऊंडेशन’ ही संस्था सरकारी आणि सरकार अनुदानित शाळांमधील सुमारे ५ सहस्र विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरवणार आहे. साळगाव परिसरातील ४० कि.मी. क्षेत्रामध्ये बार्देश, तिसवाडी, डिचोली आणि पेडणे तालुक्यांमध्ये ही सेवा उपलब्ध होणार आहे. ‘अक्षय पात्र फाऊंडेशन’च्या ३ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या पहिल्या अत्याधुनिक स्वयंपाकघर सुविधेचे उद्घाटन १७ मार्च या दिवशी सकाळी १० वाजता पिळर्ण औद्योगिक वसाहतीमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
शिक्षणमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मते गोव्यात सध्या स्वयंसाहाय्य गट शाळांमध्ये माध्यान्ह आहार पुरवत असतात. काही ठिकाणी माध्यान्ह आहाराचा अपेक्षित दर्जा नसल्याने आणि मुलांना पौष्टिक खायला मिळावे, यासाठी ‘अक्षय पात्र फाऊंडेशन’ला गोव्यात स्थान देण्यात आले आहे; मात्र गोव्यातील स्वयंसाहाय्य गट पुरवत असलेल्या माध्यान्ह आहार व्यवस्थेला कोणतीही हानी न पोचवता ‘अक्षय पात्र’ माध्यान्ह आहार पुरवणार आहे. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांच्या मते ‘अक्षय पात्र’ पहिल्या टप्प्यात २ सहस्र ५०० विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरवणार आहे.’’ ‘अक्षय पात्र फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर वेंकट म्हणाले, ‘‘अक्षय पात्र’चे माध्यान्ह आहारातील खाद्यपदार्थ हे स्थानिकांच्या आवडीनावडीनुसार सिद्ध केले जाणार आहेत. ‘अक्षय पात्र’चा माध्यान्ह आहार हा अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि उत्तम दर्जा यांसाठी प्रसिद्ध आहे. या उपक्रमाचा उद्देश केवळ मुलांना पुरेसा आहार मिळवून देणे आणि विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन गोव्याचे नाव उज्ज्वल करण्याच्या प्रक्रियेला चालना देणे हा आहे.
काय आहे ‘अक्षय पात्र फाऊंडेशन’ ?
‘अक्षय पात्र फाऊंडेशन’ ही एक ‘ना नफा’ संस्था आहे आणि ती देशभरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उपासमार आणि कुपोषण दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये पंतप्रधान पोषण अभियान (माध्यान्ह आहार योजना) राबवून उपासमारीशी लढा देणे आणि त्याच वेळी मुलांना शाळेत आणणे, हे ‘अक्षय पात्र’चे उद्दिष्ट आहे. ही संस्था वर्ष २००० पासून पौष्टिक अन्न मुलांपर्यंत पोचवण्यासाठी काम करते. ही संस्था ‘ना नफा’ तत्त्वावर चालणारी जगातील सर्वांत मोठी माध्यान्ह आहार पुरवणारी संस्था बनली आहे. भारतातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेश येथील २३ सहस्रांहून अधिक शाळांमधील २२ लाख ५० सहस्रांहून अधिक मुलांना ही संस्था पौष्टिक अन्न पुरवत आहे.