आंध्रप्रदेशमध्ये ‘वन्दे भारत’ एक्सप्रेसमध्ये सिगारेट पेटवल्याने गोंधळ !

गाडीच्या काचा तोडून प्रवासी पडले बाहेर

तिरुपती – तिरुपतीहून सिकंदराबादला जाणार्‍या ‘वन्दे भारत’ एक्सप्रेसमध्ये मोठा गोंधळ झाल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. प्रवाशांनी अक्षरशः गाडीच्या काचा फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोंधळाला प्रवाशाने नियमबाह्यरित्या  सिगारेट पेटवल्याचे कारण ठरल्याचे वृत्त आहे.

या गाडीमध्ये एका प्रवाशाला सिगारेट ओढण्याची इच्छा झाली; पण रेल्वेगाडीमध्ये सर्वांसमोर सिगारेटचे झुरके घेणे शक्य नव्हते. त्याने गाडीतील शौचालय गाठले आणि तिथे  सिगारेट पेटवली. काही वेळात शौचालयामध्ये सिगारेटचा धूर पसरताच लगेच ‘फायर अलार्म’ वाजू लागला. त्यानंतर स्वयंचलित अग्नीशमन यंत्रणा कार्यरत झाली. ‘फायर अलार्म’ वाजल्याने प्रवासी गांगरून गेले आणि त्याच गोंधळात जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा पळू लागले. रेल्वेगाडीला आग लागल्याच्या भीतीने काहींनी डब्याच्या काचा फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. (अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतांना त्याविषयीचे प्रबोधन तेवढेच महत्त्वाचे आहे, हे रेल्वे प्रशासानाच्या लक्षात येत नाही का ? – संपादक)

या सगळ्या गोंधळाला उत्तरदायी असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (आरोपीवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, जेणेकरून इतर प्रवासी असे प्रकार करण्यास धजावणार नाही ! – संपादक)