सिंधुदुर्ग : तात्पुरते स्थानांतर केलेली शिक्षिका एक मासानंतरही मूळ शाळेत आली नाही !

मुलांना शाळेच्या अंगणात बसवून आंबेगाव ग्रामस्थांचे ‘शाळा बंद आंदोलन’

पालकांचे मुलांना शाळेच्या अंगणात बसवून शाळा बंद आंदोलन

सावंतवाडी – जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आंबेगाव क्रमांक १ या शाळेतील शिक्षिकेची अन्य शाळेत तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. ही शिक्षिका एक मासानंतरही मूळ शाळेत परत न आल्याने पालकांनी २४ जुलै या दिवशी मुलांना शाळेच्या अंगणात बसवून शाळा बंद आंदोलन केले. ‘सरकारने याची नोंद न घेतल्यास बेमुदत आंदोलन करू’, अशी चेतावणी पालकांनी दिली आहे.

आंबेगाव क्रमांक १ या शाळेची पटसंख्या ८० ते ९० एवढी असते. गेल्या ३ ४ वर्षांपासून या शाळेत एकच पदवीधर शिक्षक कार्यरत होते. यावर्षी झालेल्या ‘ऑनलाईन’ स्थानांतर प्रक्रियेनंतर २ पदवीधर शिक्षक शाळेत सेवारत झाले; मात्र शिक्षण विभागाने शाळेच्या पहिल्या दिवशीच एका पदवीधर शिक्षिकेस आदेश काढून दुसर्‍या शाळेत कामगिरीवर पाठवले. २० दिवसांच्या तात्पुरत्या कालावधीसाठी ही नियुक्ती केली होती; मात्र आता एक मास पूर्ण झाला, तरी त्या शिक्षिकेला पुन्हा आंबेगाव शाळेत पाठवलेले नाही, असा आरोप करत ग्रामस्थांनी आंदोलन केले.
‘पदवीधर शिक्षिका मूळ शाळेत उपस्थित होईपर्यंत ‘बेमुदत शाळा बंद आंदोलन’ चालू राहील. यामुळे पुढे होणार्‍या सर्व परिणामांस सरकार उत्तरदायी राहील’, अशी चेतावणी पालकांनी दिली.

संपादकीय भूमिका

  • प्रशासनाचा भोंगळ कारभार !
  • वेळ मारून नेणारी उपाययोजना केल्याने एक समस्या सोडवतांना दुसर्‍या समस्या निर्माण !