अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

मंगेश कदम या आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी आणि १४ सहस्र रुपयांचा दंड

रत्नागिरी, १२ जुलै (वार्ता.) – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या देवरुख येथील मंगेश एकनाथ कदम (वय ४१ वर्षे) या आरोपीला रत्नागिरी येथील विशेष पॉक्सो न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि १४ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ही घटना देवरुख पोलीस ठाण्याचे हद्दीत १४ मार्च २०२१ या दिवशी दुपारी १.१५ च्या सुमारास घडली होती. आरोपी मंगेश एकनाथ कदम याला पीडिता अल्पवयीन आहे, हे ठाऊक असतांनाही त्याने तिला वाईट हेतूने स्वत:च्या घरी बोलावून तिच्याशी अश्लील गैरकृत्य करून विनयभंग केला होता; म्हणून तपासिक अंमलदार विद्या पाटील, पोलीस निरीक्षक देवरुख यांनी दोषारोपपत्र प्रविष्ट करून भा.दं.वि. कलम ३५४ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३(८) ४, ५, ९ (M) १० अन्वये गुन्हा नोंद केला होता.

सरकार पक्षाच्या वतीने ११ साक्षीदार तपासण्यात आले, तर आरोपीच्या बचावाचे ५ साक्षीदार तपासण्यात आले. मिळालेला पुरावा आणि दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्ती वैजयंतीमाला राऊत यांनी आरोपीला कलम ३५४ नुसार १ वर्ष कारवास, १ सहस्र रुपये दंड, पॉक्सो कलम ३(c) ४ नुसार २० वर्षे सश्रम कारावास आणि ५ सहस्र रुपये दंड ७/८ नुसार ३ वर्षे कारावास अन् ३ सहस्र रुपये दंड; ९/१० नुसार ५ वर्षे कारावास आणि ५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अधिवक्ता म्हणून अधिवक्त्या (सौ.) मेघना नलावडे यांनी काम पाहिले. पेहेरवी म्हणून वर्षा चव्हाण यांनी काम पाहिले.