रामनाथी (गोवा) – आपण त्या परंपरेतून आलो आहोत, जेथे सत्याला आदर्श मानले जाते, तर खोटे बोलण्याला अधर्म समजले जाते. शत्रूशी लढण्यासाठी हिंदूंनी स्वयंबोध म्हणजे स्वत:चा धर्म समजून घेणे आवश्यक आहे, तसेच शत्रूचा प्रतिकार करण्यासाठी शत्रूबोधही करून घेणे म्हणजेच शत्रूच्या हालचाली समजून घेणे आवश्यक आहे. कुराणमध्ये मुसलमानेतरांसाठी ‘काफिर’ हा शब्द वापरला आहे. काफिरांविरोधात जिहाद करण्याचा संदेशही कुराणामध्ये देण्यात आला आहे. बंगाल, काश्मीर, केरळ यांसारख्या मुसलमान बहुसंख्य असलेल्या ठिकाणी ते हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे प्रकार करत नाहीत. ज्या ठिकाणी ते अल्पसंख्यांक आहेत, तेथे हे असे प्रकार करून जवळीक साधण्याच्या प्रयत्न करतात. त्यामुळे हिंदूंनी प्रथम शत्रूच्या हालचाली समजून घेणे आवश्यक आहे, असे उद़्गार पंचकुला (हरियाणा) येथील ‘विवेकानंद कार्य समिती’चे अध्यक्ष श्री. नीरज अत्री यांनी काढले. ते १६ ते २२ जून या कालावधीत रामनाथी, गोवा येथे आयोजित केलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त बोलत होते.
या वेळी व्यासपिठावर भुवनेश्वर (ओडिशा) येथील ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’चे संयोजक श्री. अनिल धीर, हिंदु जनजागृती समितीचे पूर्व उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी, ‘सत्यमेव जयते’ या संघटनेचे अध्यक्ष डॉ. सत्यमेव जयते लोक मंगल आणि मध्यप्रदेश येथील ‘हिंदु सेवा परिषदे’चे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता अतुल जेसवानी हे मान्यवर उपस्थित होते.
भारतातील शिक्षणाचा दर्जा उंचावणे आवश्यक ! – अनिल धीर, संयोजक, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज, भुवनेश्वर, ओडिशा
भारतात गुरु-शिष्य परंपरा होती, तेव्हा भारत विश्वगुरु होता. त्या काळामध्ये असंख्य ग्रंथ लिहिले गेले. येथे विदेशातून मुले शिकायला येत होती आणि आता त्याच्या उलट होत आहे. भारतातील ८ लाख ८० सहस्र मुले विदेशात शिकत आहेत आणि कालांतराने ते तेथेच स्थायिक होणार आहेत. त्यामुळे भारताने शिक्षणव्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
ओडिशामध्ये ६२ जमाती आहेत. आम्ही वनवासींकडून ३० सहस्र पोथ्या एकत्र केल्या आणि त्या सर्व ओडिशा राज्यातील संग्रहालयांमध्ये पाठवून दिल्या. त्या पोथ्यांमध्ये श्लोक वगैरे नव्हते, तर ‘विमानांची निर्मिती कशी करावी ? मंदिरांचे बांधकाम कसे करावे ?’ आदी प्रत्येक विषयावर विवरण देण्यात आले होते. यावरून काही सहस्र वर्षांपूर्वी त्यांनी किती उच्च दर्जाचे लिखाण केले होते, हे लक्षात येते. अशा आदिवासींकडे कोणतीही लिपी नाही. त्यांचे हे ज्ञान वडिलांकडून मुलाकडे हस्तांतरित होत गेले. या आदिवासी मुलांना चांगले शिक्षण मिळाले, तर भारत अधिक चांगली प्रगती करील. त्यामुळे सरकारने त्यांच्यासाठी विशेष शाळा उघडण्याची आवश्यकता आहे.
जगन्नाथपुरी येथे २० जून या दिवशी विश्वप्रसिद्ध भगवान जगन्नाथाची रथयात्रा असतांनाही या दिवशी ओडिशातील हिंदु धर्माभिमानी श्री. अनिल धीर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये उपस्थित राहिले.
हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अधिक तीव्रतेने प्रयत्न करायला हवेत ! – अधिवक्ता अतुल जेसवानी, संस्थापक आणि प्रदेशाध्यक्ष, हिंदू सेवा परिषद, मध्यप्रदेश
आपल्या आजूबाजूला ‘लव्ह जिहाद’च्या अनेक घटना घडतात. या घटना रोखण्यासाठी हिंदूंनी खोलात जाऊन काम करणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या घटना लक्षात येताच हिंदु बांधवांनी त्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांपर्यंत पोचवायला हव्यात. ‘धर्मावरील आघात होण्यापूर्वीच ते लक्षात येतील’, अशी व्यवस्था हिदूंनी निर्माण करायला हवी. ‘हिंदु राष्ट्र म्हणजे केवळ ज्याच्यावर आपली मालकी आहे, असा भूमीचा तुकडा नव्हे, तर ‘जेथे लव्ह जिहाद, गोहत्या, बलात्कार, धर्मांतर आदी होणार नाही’, असे राष्ट्र होय. ‘हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे’; म्हणून हिंदूंनी स्वस्थ राहून चालणार नाही. उलट हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अधिक तीव्रतेने प्रयत्न करायला हवेत, तसेच धर्मकार्य श्रद्धेने करायला हवे.
राष्ट्राच्या उत्थानासाठी योग आणि अध्यात्म यांची आवश्यकता ! – डॉ. सत्यमेव जयते लोक मंगल, अध्यक्ष, सत्यमेव जयते
भारत स्वतंत्र झाल्यानंतर शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार थांबलेला नाही. शासकीय कार्यालये, शाळा यांमध्ये योग आणि अध्यात्म यांचे शिक्षण दिल्यास भ्रष्टाचार रोखता येईल. अध्यात्म ही भारताची शक्ती आहे. शासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अध्यात्माविना भारत कमकुवत आहे. समाजामध्ये अध्यात्माचा प्रसार केल्यास राष्ट्र निर्माणाचे कार्य सुलभ होईल. शासकीय कार्यालयांमध्ये अध्यात्म, ध्यानधारणा आणि योग यांचे शिक्षण दिले असते, तर सुराज्याची संकल्पना साध्य झाली असती. ‘अध्यात्म’ ही भारताची महानता आहे. सर्व हिंदु समाज अध्यात्माचा अंगीकार करील, तेव्हा भारत सूर्याप्रमाणे तेजस्वी होईल. ‘संपूर्ण जग कुटुंब आहे’, हे आपले ध्येय आहे. हिंदूंनी साधना केली, तरच ही संकल्पना साध्य होऊ शकेल. हिंदु राष्ट्राची स्थापना करतांना पुढील १ सहस्र वर्षांचा आराखडा निश्चित करायला हवा.
सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध घटनात्मक मार्गाने लढा देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे ‘सुराज्य अभियान’ ! – विश्वनाथ कुलकर्णी, राज्य समन्वयक, पूर्व उत्तरप्रदेश आणि बिहार
आज सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार बोकाळला आहे. याविषयी सर्वजण अप्रसन्न आहेत; पण त्याविषयी काय करता येईल, हे ठाऊक नसल्यामुळे ते अडकतात आणि भ्रष्ट व्यवस्थेचा एक भाग बनतात. अशा सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध राज्यघटनात्मक मार्गाने लढा देण्यासाठी वर्ष २०१७ मध्ये अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने ‘सुराज्य अभियान’ चालू केले. शासकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील अपप्रकारांविरुद्ध घटनात्मक पद्धतीने लढा देणे आणि जनजागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ‘सुराज्य अभियान’ हे आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येकच गोष्टीमध्ये लागू होणार्या समस्यांसाठी आहे. त्यामुळे आम्ही आपल्या सर्वांना आवाहन करतो की, आपल्या परिसरात होत असलेल्या अपप्रकारांच्या विरोधात वैध मार्गाने लढा द्यायला आरंभ करा. हाही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याचाच एक महत्त्वपूर्ण भाग आहे.