सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ‘वयाच्‍या ८० व्‍या वर्षी भक्‍तीयोगाची साधना चालू झाली’, हे उद़्‍गार आणि त्‍याचा पू. संदीप आळशी यांनी सांगितलेला गर्भितार्थ !

माझ्‍या भक्‍तीयोगाच्‍या साधनेला १३.४.२०२३ या दिवशी खर्‍या अर्थाने आरंभ होणे ! – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. साधनेच्‍या प्रारंभीपासूनच डॉक्‍टरांची ज्ञानयोग आणि कर्मयोग प्रधान साधना असणे

‘डॉक्‍टर झाल्‍यावर वयाच्‍या ३० व्‍या वर्षापासून ४० व्‍या वर्षापर्यंत मी ‘संमोहन उपचारतज्ञ’ म्‍हणून व्‍यवसाय केला. नंतर मला जिज्ञासेपोटी आलेल्‍या अनेक प्रश्‍नांची उत्तरे संमोहनशास्‍त्राद्वारे न मिळाल्‍याने मी आध्‍यात्मिक ग्रंथांचे थोडेफार वाचन चालू केले. नंतर ‘अध्‍यात्‍माद्वारे उत्तरे मिळण्‍यासाठी साधना आवश्‍यक आहे’, हे लक्षात आल्‍यावर मी थोडीफार साधना करू लागलो. तेव्‍हा मला अनेक छोट्या प्रश्‍नांची उत्तरे मिळू लागली; म्‍हणून मी साधकांना ‘साधना करा’, असे सांगू लागलो. ‘कोणत्‍या योगमार्गाने साधना केल्‍यास मला प्रश्‍नांची उत्तरे मिळू शकतील ?’, याचा विचार मी करत असे. ज्ञानयोग आणि कर्मयोग यांत मला विविध प्रश्‍नांची बुद्धीच्‍या स्‍तरावरील उत्तरे मिळू लागल्‍यामुळे मी त्‍यांचा अभ्‍यास करू लागलो. माझी भक्‍तीयोगानुसार साधना म्‍हणजे मी माझ्‍याकडे उपचारांसाठी येणार्‍या रुग्‍णांना देवाचा नामजप करण्‍यास सांगू लागलो, इतकीच होती; पण तेव्‍हापासून मलाही ‘अधिकाधिक वेळ साधना करावी’, असे वाटू लागले.  भक्‍तीयोगात बौद्धिक (बुद्धीच्‍या स्‍तरावरची) उत्तरे बहुधा नसल्‍याने मी आयुष्‍यातील वय ५० वर्षे ते ८० व्‍या वर्षापर्यंतची ३० वर्षे ज्ञानयोग आणि कर्मयोग यांचा अभ्‍यास करण्‍यासाठीच वापरली.

२. भक्‍तीयोगाची साधारणपणे झालेली ओळख

वर्ष २००३ मध्‍ये सनातनच्‍या साधकांवर वाईट शक्‍तींची आक्रमणे होऊ लागली. साधकांचे वाईट शक्‍तींपासून रक्षण होण्‍यासाठी मी विविध आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय शोधू लागलो. वाईट शक्‍तींशी लढतांना ‘भाव’ हा घटक खूप परिणामकारक असल्‍याचे माझ्‍या लक्षात आले. ‘भाव’ असेल, तर वाईट शक्‍ती साधकांना त्रास देऊ शकत नाही’, हे लक्षात आल्‍यावर ‘साधकांची भावजागृती व्‍हावी’, या उद्देशाने मी त्‍या संदर्भातील ग्रंथ संकलित केले.

पुढे समाजाला धर्मशास्‍त्राचे महत्त्व सांगण्‍यासाठी ‘धर्मशास्‍त्र असे का सांगते ?’, या ग्रंथमालिकेच्‍या अंतर्गत ‘देवपूजा कशी करावी ? आरती कशी करावी ?’ इत्‍यादी ग्रंथही संकलित केले.

३. ज्ञानयोग आणि कर्मयोग यांनुसार झालेल्‍या साधनेनंतरही साधनेत राहिलेली पोकळी भक्‍तीयोगाने भरून निघणे

ज्ञानयोग आणि कर्मयोग यांतूनही सर्व प्रश्‍नांची उत्तरे न मिळाल्‍याने पुढे मी ‘माझ्‍याकडे असलेल्‍या भक्‍तीमार्गविषयक पुस्‍तकांतून काही उत्तरे मिळतात का ?’, याचा अभ्‍यास चालू केला. १३.४.२०२३ या दिवशी माझ्‍या लक्षात आले की, मी आतापर्यंत ज्ञानयोग आणि कर्मयोग यांचा अधिक अभ्‍यास केला; पण मला भक्‍तीमार्गासंबंधी फारच थोडी माहिती आहे; म्‍हणून मी ‘भक्‍तीमार्गात काय शिकवतात ?’, या जिज्ञासेने त्‍याचा अभ्‍यास चालू केला. तेव्‍हा माझ्‍या लक्षात आले की, भक्‍तीमार्गातील ग्रंथ वाचून ज्ञानयोगासारखी उत्तरे मिळत नाहीत, तर मनाच्‍या स्‍तरावर शिकणे होते. सर्वांत महत्त्वाचे म्‍हणजे त्‍यातून भाव जागृत होण्‍यास साहाय्‍य होते. साधनेत भावजागृतीला महत्त्व असल्‍याने मी भक्‍तीमार्गातील ग्रंथांचा अधिकाधिक अभ्‍यास चालू केल्‍यावर मला काही अनुत्तरित प्रश्‍नांची उत्तरेही मिळू लागली; पण ज्ञानाऐवजी ‘भाव जागृत होणे’, हे मी अनुभवू लागलो. मला ‘भाव तेथे देव’ हे ज्ञात असल्‍याने आता अधिकाधिक भावावस्‍थेत रहाण्‍यासाठी मी ज्ञानयोग आणि कर्मयोग या विषयांवरील ग्रंथ अधिक न वाचता केवळ भक्‍तीयोगानुसारच्‍या ग्रंथांचे वाचन करत आहे.

अशा रितीने माझ्‍या गुरूंच्‍या कृपेने १३.४.२०२३ या दिवशी, म्‍हणजे वयाच्‍या ८० व्‍या वर्षी माझी भक्‍तीयोगाची साधना चालू झाली. आतापर्यंत पुढील काळात प्रकाशित करावयाच्‍या सुमारे ५००० ग्रंथांसाठी जमा केलेल्‍या लिखाणामध्‍ये बहुतांश लिखाण ज्ञानयोग आणि कर्मयोग यांच्‍या आधारे लिहिलेले आहेेत. आता मी लिहिणार असलेले यापुढील अनेक लेख आणि ग्रंथ भक्‍तीयोगासंदर्भातही असतील.

‘महर्षि व्‍यासांनी ज्ञानयोगानुसार साधना करतांना वेद आणि पुराणे यांची रचना केली. सर्वांत शेवटी जेव्‍हा त्‍यांनी भागवत पुराण लिहिले, तेव्‍हा त्‍यांना खर्‍या समाधानाची प्राप्‍ती झाली. अशाच अनुभूतीचा थोडाफार प्रत्‍यय मला आता येत आहे.

‘माझ्‍या गुरूंनी मला भक्‍तीयोगाचे महत्त्व लक्षात आणून दिल्‍यामुळे आता माझ्‍या साधनेचे पूर्णत्‍व साधून दिले’; म्‍हणून मी गुरूंप्रती कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले  (३.६.२०२३)

पू. संदीप आळशी

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांनी सांगितलेले भक्‍तीयोगाचे महत्त्व’ यातील गर्भित अर्थ लक्षात घेऊन भक्‍तीयोगाची साधना वाढवा ! – पू. संदीप आळशी

‘ब्रह्मानन्‍दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं
द्वन्‍द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्‍यादिलक्ष्यम् ।

  एकं नित्‍यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद़्‍गुरुं तं नमामि ॥
– गुरुगीता, श्‍लोक १११

अर्थ : ब्रह्मरूप, आनंदरूप, परमोच्‍च सुख (आनंद) देणारे, केवळ ज्ञानस्‍वरूप, द्वन्‍द्वरहित, आकाशाप्रमाणे (निराकार), ‘तत्त्वमसि’ या महावाक्‍याचे लक्ष्य (‘ते (ब्रह्म) तू आहेस’ असे वेदवाक्‍य ज्‍याला उद्देशून आहे ते), एकच एक, नित्‍य, शुद्ध, स्‍थिर, सर्वज्ञ, सर्वकाही साक्षीभावाने पहाणारे, भावातीत आणि गुणातीत अशा सद़्‍गुरूंना मी नमस्‍कार करतो.  

श्री गुरूंना ‘भावातीतं’, म्‍हणजे ‘भावाच्‍या पलीकडे गेलेले’, असे म्‍हटले आहे. अखिल मानवजातीच्‍या उद्धारासाठी कार्यरत असलेले जगद़्‍गुरु सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हेही भावाच्‍या पलीकडील अशा ब्रह्मलीन अवस्‍थेत आहेत.

५.५.२०१८ या दिवशी नाडीपट्टीवाचनाच्‍या माध्‍यमातून महर्षि मयन यांनी म्‍हटले आहे, ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे भगवान श्रीकृष्‍णाचेच अंशात्‍मक रूप असून ते धर्मसंस्‍थापनेच्‍या कार्यासाठीच भूतलावर अवतरले आहेत !’

          भगवान श्रीकृष्‍णाने म्‍हटले आहे –

          न मे पार्थास्‍ति कर्तव्‍यं त्रिषु लोकेषु किञ्‍चन ।
नानवाप्‍तमवाप्‍तव्‍यं वर्त एव च कर्मणि ॥
– श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय ३, श्‍लोक २२

अर्थ : हे पार्था, मला या तिन्‍ही लोकांत काहीही कर्तव्‍य नाही आणि ‘मिळवण्‍याजोगी कोणतीही वस्‍तू मिळाली नाही’, असे नाही, तरीही मी कर्तव्‍यकर्म करतच असतो.

साक्षात् श्रीकृष्‍णासम असलेल्‍या सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांना खरे पहाता कोणतेही कर्म करण्‍याची आवश्‍यकता नाही, तरीही केवळ साधकांच्‍या कल्‍याणासाठी आणि साधकांना ‘हिंदु राष्‍ट्र’ अनुभवण्‍यास मिळण्‍यासाठी ते आज वयाच्‍या ८१ व्‍या वर्षीही अविरत कार्यरत आहेत. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टर निर्गुण स्‍तरावरील उच्‍च आध्‍यात्मिक अवस्‍थेत स्‍थित असल्‍याने त्‍यांना सगुण स्‍तरावरील भावजागृतीची अवस्‍था अनुभवण्‍याचीही आवश्‍यकता नाही. असे असतांनाही ते ती अनुभवून स्‍वतःच्‍या अनुभवांतून भक्‍तीयोगाचे महत्त्व सांगत आहेत. ‘साधक कर्मयोगी आणि ज्ञानयोगी असला, तरी भक्‍तीयोगाविना त्‍याच्‍या साधनेचा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही’, हेच जणू ते साधकांच्‍या मनावर बिंबवत आहेत.

आगामी महाभीषण आपत्‍काळात ‘आपण जीवित राहू शकू कि नाही’, याचीही निश्‍चिती देता येत नाही. मात्र भगवंताने निश्‍चिती दिली आहे –

न मे भक्‍तः प्रणश्‍यति । – श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय ९, श्लोक ३१
अर्थ : माझ्‍या भक्‍ताचा नाश होणार नाही.

भगवंताचे भक्‍त व्‍हायचे असेल, तर आतापासूनच भक्‍ती वाढवण्‍यासाठी तळमळीने प्रयत्न करायला हवेत. ‘हे साधकांच्‍या मनावर बिंबावे’, यासाठी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांनी वरील लेखातून भक्‍तीचे महत्त्व विशद केले आहे.

‘विष्‍णुस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टर हे पूर्णत्‍वाला पोचलेले असूनही जीवनात प्रत्‍येक टप्‍प्‍यावर कसे शिकत असतात’, हेही त्‍यांनी लिहिलेल्‍या लेखांवरून कळते. यातून साधकांनीही ‘साधना करतांना सतत जिज्ञासा आणि शिकण्‍याची वृत्ती कशी जागृत ठेवायला हवी’, हे लक्षात येते.

भक्‍तीमार्गी प्रकृती नसलेल्‍या साधकांना भक्‍ती वाढवण्‍यासाठी प्रयत्न करतांना कठीण वाटते. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टर स्‍वतः भक्‍तीयोगाचा प्रचार करण्‍यासाठी प्रयत्नशील झाले असल्‍याने आणि त्‍यांना सतत साधकांच्‍या आध्‍यात्मिक प्रगतीचाच ध्‍यास असल्‍याने एकप्रकारे त्‍यांचा ‘साधकांची भक्‍ती वाढावी’, असा अव्‍यक्‍त संकल्‍पच कार्यरत झाला आहे. त्‍यामुळे साधकांनीही मनापासून भक्‍तीवृद्धीसाठी प्रयत्न केल्‍यास त्‍या संकल्‍पाचे फलस्‍वरूप त्‍यांची भक्‍ती निश्‍चितच वाढेल. ‘आम्‍हा साधकांना ईश्‍वरप्राप्‍ती व्‍हावी’, ही तळमळ आमच्‍यापेक्षा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांनाच अधिक आहे. अशा भगवंतस्‍वरूप गुरुमाऊलीच्‍या चरणी कितीही कृतज्ञता व्‍यक्‍त केली, तरी ती अपुरीच आहे !’

 पू. संदीप आळशी (७.६.२०२३)   

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.