सांगली जिल्ह्यात ‘महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम’ची काटेकोर कार्यवाही व्हावी ! – गोरक्षकांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

पोलीस अधीक्षक बसवराव तेली (डावीकडे) यांना निवेदन देतांना पू. संभाजीराव भिडेगुरुजी, तसेच अन्य गोरक्षक

सांगली – बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मिळत असलेल्या खात्रीशीर माहितीनुसार कारवाईच्या प्रसंगी पिंपरी, मालेगावप्रमाणे प्राणी रक्षण पथक उपलब्ध व्हावे, तसेच सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमची काटेकोर कार्यवाही व्हावी, या मागणीचे निवेदन ‘अखिल भारत कृषि गौसेवा संघ’ यांच्या वतीने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांना देण्यात आले. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, पुणे येथील श्री. प्रकाश कोलते, गोरक्षक सर्वश्री अंकुश गोडसे, नितेश ओझा, कृष्णा यादव, धारकरी श्री. सचिन पवार आणि श्री. शेखर जगताप उपस्थित होते.

१. गेल्या काही दिवसांत सांगली शहर आणि जिल्ह्यात अवैध पशू वाहतूक, पशूवधगृह, पशू क्रूरता यांसंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. ही कारवाई करतांना पुष्कळ दिरंगाई केली जाते. यामुळे गुन्हेगारास गुन्हा लपवण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यास वेळ मिळतो. त्यामुळे सर्व दोषी घटकांना सहभागी करून कारवाई होत नाही.

२. अवैध पशूवधगृहावर कारवाई झाल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी तेच गुन्हे घडत आहेत. ते टाळण्यासाठी अवैध पशूवधगृह संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून टाळे ठोकून कायदेशीर प्रक्रियेने पाडण्यात यावे, तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अशा गुन्ह्यांत सापडलेल्या जिवंत प्राण्यांची त्वरित सोडवणूक, प्रथमोपचार, चारा, पाणी यांची सोय व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.