शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा
सावंतवाडी – शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या जागी निवृत्त शिक्षक अथवा डी.एड्., बी.एड्. झालेले उमेदवार यांना सामावून घेतले जाणार आहेत. यामध्ये गुणवत्ता सूचित आलेल्यांनाच संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी २० सहस्र रुपये मानधन ठरवण्यात आले आहे; मात्र यात निवड झालेले उमेदवार भविष्यात ‘सेवेत कायम करा’, असा दावा करू शकत नाहीत. याविषयीचा शासन अध्यादेश आठवड्यात काढू, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केली.
शिक्षकांचा रिक्त जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी त्या जागी निवृत्त झालेले शिक्षक अथवा डी. एड, बी.एड झालेल्या पात्र उमेदवारांना सेवेत घेतले जाणार आहे. या उमेदवारांना वीस हजार रुपये मानधन मिळेल. मात्र भविष्यात हे शिक्षक कायमस्वरूपी नोकरीचा दावा करू शकणार नाहीत. pic.twitter.com/Gs4qYfnHLw
— Deepak Kesarkar (@dvkesarkar) June 25, 2023
जिल्ह्याच्या दौर्यावर आलेले मंत्री केसरकर यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘सावंतवाडी अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. असे असले, तरी बँकेला कोणत्याही परिस्थितीत अडचण येऊ देणार नाही. या बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करीन; मात्र ज्यांना येथे निवडणूक लढवायची इच्छा आहे, त्यांनी बँकेला उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करावा.’’
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस आदी उपस्थित होते.