छोट्या संघटनांना एकत्र करून हिंदुत्वाचे कार्य करायला हवे ! – पू. रामबालक दासजी महात्यागी महाराज, संचालक, श्री जामडी पाटेश्‍वरधाम सेवा संस्थान, पाटेश्‍वर धाम, छत्तीसगड

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ षष्ठम दिवस – मान्यवरांचे विचार

विद्याधिराज सभागृह, २१ जून (वार्ता.) – केवळ व्यासपिठावरून घोषणा करून हिंदु राष्ट्राची स्थापना होणार नाही. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्यक्ष कार्य करण्याची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या पद्धतीने काम केल्यामुळे हिंदूंची शक्ती विभागली जाते. गावागावांत महिलांचे गट शासकीय योजनांद्वारे काम करत असतात. या महिलांच्या गटांना धर्मकार्यात सहभागी करून घ्यायला हवे. गावांमध्ये ज्याप्रमाणे स्वच्छता अभियान राबवले जाते, त्याप्रमाणे संस्कारांच्या प्रसारासाठी अभियान राबवायला हवे.

पू. रामबालक दासजी महात्यागी महाराज

अशा प्रकारे संस्कार वाहिनीच्या माध्यमातून छत्तीसगडमध्ये १५ सहस्रजण कार्यरत आहेत. ही संख्या १ लाखापर्यंत पोचवण्याचा आमचा संकल्प आहे. या सर्वांना काम करण्यासाठी जे साहित्य आवश्यक आहे, ते सर्व संस्कार वाहिनीकडून उपलब्ध करून दिले जात आहे. हे साहित्य देण्यासाठी निधीची आवश्यकता असते; मात्र संतांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्यास या अडचणी येत नाहीत. राजकीय कार्याच्या बाहेर येऊन धर्मासाठी कार्य करायला हवे. आर्य चाणक्य यांनी राजकीय शक्तीचा उपयोग धर्मकार्यासाठी करून घेतला. याचा आदर्श घेऊन आम्ही धर्मकार्य करत आहोत. यापूर्वी राजकीय पक्षांनी आमचा उपयोग करून घेतला. आता मात्र राजकीय शक्तीचा आम्ही धर्मकार्यासाठी उपयोग करून घेत आहोत. ख्रिस्ती मिशनरी प्रलोभन दाखवून गरीब हिंदूंचे धर्मांतर करतात; मात्र आम्ही हिंदूंना आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे छत्तीसगड येथील धर्मांतर रोखता आले. जे धर्मांतरित झाले त्यांना दूर न लोटता त्यांना प्रेमाने जवळ करायला हवे. असे केल्यास हिंदूंचे धर्मांतर होणार नाही. प्रभु श्रीराम यांनी वनवासाच्या काळात वानरांसह वनवासींना प्रेम देऊन आपल्या कार्यात जोडून घेतले. प्रभु श्रीरामांचा आदर्श घेऊन आपणाला कार्य करायचे आहे, असे वक्तव्य वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सहाव्या दिवशी छत्तीसगडमधील श्री जामडी पाटेश्‍वरधाम सेवा संस्थानचे संचालक पू. रामबालक दासजी महात्यागी महाराज यांनी केले.