वीरशैव लिंगायत हे हिंदूच ! – पू. श्री.ष.ब्र.प्र.१०८ (डॉ.) विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी, मठाधिपति, गणाचार्य मठ संस्थान, मुखेड, नांदेड, महाराष्ट्र

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ पंचम दिवस – मान्यवरांचे विचार

रामनाथ देवस्थान – लिंगायत ही बोलीभाषा आहे. त्यामुळे ‘वीरशैव लिंगायत’ असेच म्हणायला पाहिजे. ते हिंदु धर्मानुसार उपासना करत असून सर्व हिंदूच आहेत. वीरशैव लिंगायत हिंदु धर्मापासून वेगळे नसून अभिन्न आहेत. आमचा हिंदु राष्ट्राच्या या कार्यामध्ये सदैव सहभाग राहील. तसेच दक्षिणेतील राज्यांमध्ये कुठेही हिंदु धर्मावर आघात झाला, तर तेथेही आम्ही सर्वजण तुमच्या समवेत आहोत, असे मत पू. श्री.ष.ब्र.प्र.१०८ (डॉ.) विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केले.

पू. श्री.ष.ब्र.प्र.१०८ (डॉ.) विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी

स्वामीजी पुढे म्हणाले, ‘‘अखंड हिंदुस्थान हे हिंदु राष्ट्रच आहे; परंतु त्याला ‘सेक्युलर’ ठरवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भारतात विविध संप्रदाय असले, तरी सर्वजण हिंदु धर्माप्रमाणे आचरण करतात. त्यामुळे सर्व जण हिंदूच आहेत. गेल्या १० वर्षांपासून लिंगायत आणि वीरशैव यांना वेगळे ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. एवढेच नाही, तर ‘फोडा आणि राज्य करा’, हे धोरण अवलंबून त्यांना हिंदु धर्मापासून वेगळे पाडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शिवाची उपासना करणारा लिंगायत आहे. गळ्यामध्ये लिंग धारण केल्याने त्याला ‘लिंगायत’ म्हणतात. लिंग हे शिवाचे प्रतीक आहे. त्यामुळे तो वीरशैव आहे. शिव आणि जीव यांचे एैक्य करण्याची विद्या शिकणारा वीरशैव आहे.’’