सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
‘संस्कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या संस्कृतोद़्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत.
१४ एप्रिल २०२३ या दिवशीच्या लेखात आपण नामांच्या लिंगांविषयी काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे जाणून घेतली. आजच्या लेखात ‘काळ’ या विषयाची माहिती पाहू.
(लेखांक १९ – भाग १)
१. ‘काळ’ म्हणजे काय ?
‘काळ’ या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ ‘वेळ’ असा आहे. वाक्यातील क्रियापदावरून ‘वाक्यात दिलेली क्रिया घडण्याची वेळ कोणती आहे ?’, याचा जो बोध आपल्याला होतो, त्याला ‘काळ’ असे म्हणतात. ‘क्रियापद’ म्हणजे ‘वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक (क्रिया दर्शवणारा) शब्द होय.’ हा शब्द वाक्याच्या शेवटी येतो. ‘तो शिक्षकांना भेटून आला’, या वाक्यात ‘आला’ हे क्रियापद आहे.
२. काळाचे तीन प्रमुख प्रकार
‘वर्तमानकाळ’, ‘भूतकाळ’ आणि ‘भविष्यकाळ’ हे काळाचे तीन प्रमुख प्रकार आहेत.
२ अ. वर्तमानकाळ : क्रियापदाच्या रूपावरून ‘क्रिया आताच्या काळात घडत आहे’, असे जेव्हा समजते, तेव्हा त्या काळाला ‘वर्तमानकाळ’ असे म्हणतात. ‘आजोबा मुलांना खाऊ देतात’, या वाक्यातील ‘देतात’ या क्रियापदावरून ‘आजोबांची मुलांना खाऊ देण्याची कृती आताच्या काळात चालू आहे’, असा बोध होतो. त्यामुळे हे वर्तमानकाळी वाक्य आहे.
२ आ. भूतकाळ : क्रियापदाच्या रूपावरून ‘क्रिया घडून गेली आहे’, असे जेव्हा समजते, तेव्हा त्याला ‘भूतकाळ’ असे म्हणतात. ‘उदय पुढील शिक्षणासाठी परदेशात गेला’, या वाक्यातील ‘गेला’ या क्रियापदावरून ‘उदयची परदेशात जाण्याची क्रिया घडून गेली आहे’, याचा बोध होतो. त्यामुळे हे भूतकाळी वाक्य आहे.
२ इ. भविष्यकाळ : क्रियापदाच्या रूपावरून ‘क्रिया पुढे घडणार आहे’, असे जेव्हा समजते, तेव्हा तो ‘भविष्यकाळ’ असतो. ‘नृत्याचा सराव करत राहिलीस, तर एक दिवस महान नृत्यांगना होशील’, या वाक्यातील ‘होशील’ या क्रियापदावरून ‘काही काळानंतर संबंधित मुलगी महान नृत्यांगना होणार आहे’, असा बोध होतो. याला भविष्यकाळ म्हणतात.
३. काळाचे उपप्रकार
३ अ. अपूर्णकाळ : हा समजून घेण्यासाठी प्रथम पुढील वाक्ये आणि त्यांचे विवरण पहाणे योग्य होईल.
३ अ १. ‘नकुल चेंडू टाकत आहे.’ – हे वाक्य वर्तमानकाळातील घटना दर्शवते. या वाक्यात नकुलची चेंडू टाकण्याची क्रिया चालू आहे. ती पूर्ण झालेली नाही.
३ अ २. ‘नकुल चेंडू टाकत होता.’ – हे वाक्य भूतकाळातील घटना दर्शवते. वाक्य भूतकाळातील असले, तरी या वाक्यावरून ‘त्या काळातही नकुलची चेंडू टाकण्याची क्रिया चालू होती. ती पूर्ण झालेली नव्हती’, हे आपल्या लक्षात येते.
३ अ ३. ‘नकुल चेंडू टाकत असेल.’ – हे वाक्य भविष्यकाळातील घटना दर्शवते. भविष्यकाळात नकुल चेंडू टाकत असेल. येथेही त्याची चेंडू टाकण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही.
आपण जाणतोच की, ‘क्रियापदातील प्रत्यय न लागलेले मूळ शब्द म्हणजे ‘धातू’ होय, उदा. थांब, बस, बोल इत्यादी.’ वरील तिन्ही वाक्यांत ‘टाक’ या धातूचे ‘टाकत’ हे ‘टाकण्या’ची क्रिया अपूर्ण असल्याचे दर्शवणारे रूप वापरले आहे. त्या रूपाच्या पुढे ‘अस’ या धातूची ‘आहे’, ‘होता’ आणि ‘असेल’ अशी अनुक्रमे वर्तमानकाळी, भूतकाळी अन् भविष्यकाळी रूपे वापरण्यात आली आहेत. या रूपांमुळे ही वाक्ये वर्तमान, भूत आणि भविष्य अशा तीन प्रमुख काळांतील होतात; पण त्या वाक्यांत सांगितलेली ‘टाकण्या’ची क्रिया या तिन्ही काळांत अपूर्णच आहे. अशा प्रकारे ‘कोणत्याही काळातील वाक्यात क्रियेची अपूर्णता दर्शवली असेल, तर त्याला ‘अपूर्णकाळ’ असे म्हणतात.’
वरीलपैकी ‘३ अ १’ या वाक्यातील काळाला ‘अपूर्ण वर्तमानकाळ’, ‘३ अ २’ या वाक्यातील काळाला ‘अपूर्ण भूतकाळ’ आणि ‘३ अ ३’ या वाक्यातील काळाला ‘अपूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.’
(क्रमशः पुढील शुक्रवारी)
– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.६.२०२३)