हिंदु राष्ट्राची चळवळ वैश्विक स्तरावर गतीमान करण्यासाठी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

सिंधुदुर्गनगरी – भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी देशात चळवळ चालू झाली आहे. अनेक संघटना या मागणीसाठी पुढे आल्या आहेत. या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी फोंडा, गोवा येथे गेल्या ११ वर्षांपासून ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित केले जात आहे. परिणामी हिंदु राष्ट्राची चर्चा आता केवळ भारतातच नाही, तर वैश्विक पातळीवर प्रारंभ झाली आहे. त्यामुळे या वर्षी हे अधिवेशन ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ म्हणून १६ ते २२ जून या कालावधीत फोंडा येथील श्री रामनाथ देवस्थान येथे आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवात हिंदु राष्ट्राची चळवळ वैश्विक स्तरावर गतीमान करण्याविषयी विचारमंथन केले जाणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत उपस्थित डावीकडून श्री. शंकर निकम, श्री. स्वागत नाटेकर, सद्गुरु सत्यवान कदम, बोलतांना श्री. सुनील घनवट आणि श्री. हेमंत मणेरीकर

येथील पत्रकारकक्षात आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेला सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम, गोरक्षक श्री. स्वागत नाटेकर, सनातन संस्थेचे श्री. शंकर निकम आणि हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर उपस्थित होते.

सद्गुरु सत्यवान कदम यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ची व्यापकता आणि याला उपस्थित रहाणारे संत यांच्याविषयी माहिती दिली.