सिंधुदुर्ग : आयी गावातील आरोग्य उपकेंद्र गत ६ मासांपासून बंद !

१९ जूनला उपोषण करण्याची सरपंचांची चेतावणी

दोडामार्ग – तालुक्यातील आयी गावातील आरोग्य उपकेंद्र गेल्या ६ मासांपासून बंद आहे. १८ जूनपर्यंत हे उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि आवश्यक त्या सोयीसुविधांसह चालू न केल्यास १९ जून या दिवशी उपकेंद्राच्या समोर उपोषणास बसू, अशी चेतावणी सरपंच तुषार नाईक यांनी दिली आहे.

याविषयी तालुका आरोग्य अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात सरपंच नाईक यांनी म्हटले आहे की, आयी आरोग्य उपकेंद्राची हेळसांड होत आहे. आरोग्य ही अत्यावश्यक सेवा असूनही या उपकेंद्रात एकही कर्मचारी नाही. ६ मासांपासून हे केंद्र बंद आहे. उपकेंद्राचा लाभ पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि रुग्ण यांना होतो; मात्र या उपकेंद्रात सध्या प्रथमोपचारही मिळत नाहीत. त्यामुळे जनतेची मोठी असुविधा होत आहे. परिणामी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे १८ जूनपर्यंत या केंद्रात वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) आणि कर्मचारी यांच्या नियुक्तीसह आवश्यक ती औषधे प्राप्त न झाल्यास १९ जून या दिवशी उपोषण करण्यात येईल.

संपादकीय भूमिका

  • ६ मास नागरिकांना आरोग्य केंद्रासारखी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून न देणे प्रशासनाला लज्जास्पद !
  • प्राथमिक आणि अत्यावश्यक सुविधांसाठी नागरिकांना आंदोलन अन् उपोषण करावे लागत असेल, तर प्रशासन हवे कशाला ? असे कुणाला वाटल्यास त्यात चूक ते काय ?