गोव्यात होणार्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त उत्तरप्रदेश आणि बिहार येथील ११० प्रतिनिधी सहभागी होणार !

वाराणसी येथील पत्रकार परिषदेत दिली माहिती

वाराणसी – भारताचे पुन्हा तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर भारताला आदर्श रामराज्य अर्थात् हिंदु राष्ट्र बनवण्याला पर्याय नाही, असे मत हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केले. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे यंदा १६ ते २२ जून या कालावधीत श्री रामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ म्हणजेच ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

डावीकडून ‘इंडिया विथ विजडम’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, परिषदेला संबोधित करतांना हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्‌गुरु नीलेश सिंगबाळ आणि व्यापार मंडळाचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. अजित सिंह बग्गा

गोव्यात होणार्‍या या महोत्सवात उत्तरप्रदेश आणि बिहार येथील ४५ हिंदु संघटनांचे ११० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती सद्गुरु सिंगबाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील पराडकर भवनात आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेला व्यापार मंडळाचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. अजित सिंह बग्गा आणि ‘इंडिया विथ विजडम’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनीही संबोधित केले.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केशरी यांनी सांगितले की, या अधिवेशनात २८ राज्यांतील ३५० हून अधिक हिंदु संघटनांचे १ सहस्र ५०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यासमवेतच अमेरिका, ब्रिटन, बेल्जियम, नेपाळ, बांगलादेश, सिंगापूर आणि इंडोनेशिया येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित रहाणार आहेत. पत्रकार परिषदेला २३ पत्रकार उपस्थित होते.

क्षणचित्रे 

१. वाराणसीत कडक उन्हाळा म्हणजे ४२ डिग्री तापमान असूनही जवळपास ३० प्रतिनिधी पत्रकार परिषदेत पूर्णवेळ उपस्थित होते.

२. पत्रकार परिषदेचे वक्ते श्री. अजितसिंग बग्गा म्हणाले की, मी २ वर्षांपासून हिंदु राष्ट्राची मागणी करत आहे. समितीचा संपर्क झाला आणि आमचे विचार जुळले. मी समितीच्या सर्व आंदोलनात आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी आहे.