दुर्बल हिंदू आणि धर्मांतर !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील ४०० अल्‍पवयीन हिंदु मुलांचे ‘ऑनलाईन’ खेळांच्‍या माध्‍यमातून धर्मांतर केले गेल्‍याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेचे धागेदोरे पोचले आहेत ठाणे येथील मुंब्‍यापर्यंत, तर याचे मूळ पाकिस्‍तानात सापडले. गाझियाबाद पोलिसांनी या घटनेची निश्‍चिती करूनच सखोल चौकशीस प्रारंभ केला आहे. गुजरात येथून झालेल्‍या एका संपर्कानंतर पोलिसांनी याची पुष्‍टी केली आहे. असे असतांनाही मुंब्रा विधानसभेचे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांना मुसलमानप्रेमाचा पुळका न आल्‍यास नवल ते काय ? ‘मुंब्‍यात ४०० काय, ४ जणांचे तरी धर्मांतर झालेले दाखवा. सत्‍य समोर न आणल्‍यास १ जुलै या दिवशी मुंब्रा बंद ठेवू’, अशी धमकीही त्‍यांनी दिली आहे. मुंब्रा हा मुसलमानबहुल परिसर असून आव्‍हाड नेहमीच त्‍यांची पाठराखण करण्‍यात धन्‍यता मानतात. मुंब्‍याचे नाव जरी कुठे आले, तरी ‘त्‍यात हिंदू कसे दोषी आहेत ? आणि मुसलमान कसे निर्दोष आहेत’, हे सांगण्‍याचा आटापिटा आव्‍हाड महाशय करतातच; पण मुंब्रा प्रकरणात काही तथ्‍ये अगदी स्‍पष्‍ट असतांना या महाशयांनी धमकी देणे हे कितपत योग्‍य ? या प्रकरणातील मुख्‍य आरोपी आणि सूत्रधार शाहनवाज खान हा त्‍याच्‍या कुटुंंबियांसमवेत पळून गेला आहे. जर आव्‍हाड यांना या प्रकरणात तथ्‍य वाटत नाही, तर मग ‘शाहनवाज पळून का गेला ?’, ‘त्‍याच्‍या शोधासाठी मुंबई आणि उत्तरप्रदेश पोलीस १० ठिकाणी धाडी टाकून अथक प्रयत्न करत आहेत, ते काय विनाकारण इतका आटापिटा करत असतील का ?’, ‘या प्रकरणात अटक केलेल्‍या एका मौलवीनेच शाहनवाजचे नाव उघड केले आहे. मग आव्‍हाड महाशय मौलवींच्‍या बोलण्‍यालाही खोटे ठरवतील का ?’, या प्रश्‍नांची उत्तरे त्‍यांनी प्रथम द्यावीत आणि मग पुराव्‍यांची भाषा करावी.

दुटप्‍पी प्रसारमाध्‍यमे !

हिंदूंच्‍या संदर्भात एखादी घटना घडली की, प्रसारमाध्‍यमांची वृत्ते देण्‍याची धार बोथट होऊन जाते. त्‍यामुळे ‘अमुक घटनेचा गौप्‍यस्‍फोट किंवा दावा केला जात आहे’, असे म्‍हणून त्‍यांची तीव्रता अल्‍प केली जाते; पण अन्‍य धर्मियांच्‍या आघातांच्‍या संदर्भातील घटना ‘ब्रेकिंग न्‍यूज’च्‍या नावाखाली प्रेक्षकांच्‍या माथीच मारल्‍या जातात. हा दुटप्‍पीपणा हिंदूंनी लक्षात ठेवायला हवा. अशा प्रसारमाध्‍यमांना वेळोवेळी त्‍यांच्‍या हिंदुद्वेषाविषयी रोखठोक प्रत्‍युत्तर द्यायला हवे; मात्र तसे होत नाही. मुंब्‍याच्‍या घटनेतही आव्‍हाडांचे विधान वारंवार दाखवून ‘घटना कशी तथ्‍यहीन आहे ?’, हे सांगण्‍याचा आटोकाट प्रयत्न करण्‍यात आला; पण हिंदूंच्‍या धर्मगुरूंचे मत जाणून घेण्‍याचा प्रयत्नही या प्रसारमाध्‍यमांनी केला नाही. खरेतर हिंदूबहुल भारतात ४०० हिंदूंचे धर्मांतर होते, हा विषय आर्थिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, व्‍यापारी अशा सर्वच क्षेत्रांमध्‍ये प्रबोधनाच्‍या दृष्‍टीने चर्चिला गेला पाहिजे होता; पण दुर्दैवाने तसे झाले नाही. मुसलमानांच्‍या संदर्भात एखादी अशा स्‍वरूपाची घटना घडली असती, तर एव्‍हाना सर्वांनीच आकाशपाताळ एक केले असते.

हिंदु पालक कधी जागे होणार ?

हिंदूंची दुर्बल आणि अशक्‍त बाजू धर्मांधांनी चांगलीच ओळखली आहे. त्‍यामुळे त्‍यांनी अल्‍पवयीन हिंदु मुलांना शिकार बनवले. पूर्वीच्‍या काळी सुटीच्‍या कालावधीत संस्‍कार शिबिरे आयोजित केली जायची; पण आता त्‍यांची जागा अनेक प्रकारच्‍या स्‍पर्धांनी घेतली आहे. परिणामी ‘धर्म’ ही बाजूच जणू अडगळीत गेली आहे. याच स्‍थितीचा अपलाभ घेत धर्मांधांनी इस्‍लामची पकड, नव्‍हे विळखा आणखीनच बळकट केला आहे. आपले मूल ‘ऑनलाईन गेम’ खेळते, ते शांत बसले आहे. आपल्‍याला त्‍याचा काही त्रास होत नाही. यामुळे त्‍याच्‍याकडे दुर्लक्ष करू नका. मुले कोणता खेळ खेळत आहेत ? याकडेही गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. ‘या खेळांची सूत्रे पाकिस्‍तानातून हलवणारे धर्मांधच मुलांना कधी तुमच्‍यापासून दूर करतील’, हे तुम्‍हालाही कळणार नाही. यानंतर तुम्‍ही जागे होणार आहात का ? आज केवळ गाझियाबादचीच घटना समोर आली. ‘आणखी अशा घटना अन्‍य ठिकाणी किती घडत असतील ?’, हे तर हिंदूंना ठाऊकही नसेल. आज ‘ऑनलाईन’ खेळांच्‍या माध्‍यमातून मुलांना इस्‍लामची शिकार करू पहाणारे हे धर्मांध उद्या शाळा-महाविद्यालयांच्‍या बाहेर उभे राहूनही हिंदु विद्यार्थ्‍यांना इस्‍लामचे धडे देण्‍यास मागे-पुढे पहाणार नाहीत. हे धर्मांध हिंदु मुलांमध्‍ये इस्‍लामच्‍या माध्‍यमातून हिंदुद्वेषाचे विष भिनवत आहेत. हे विष भिनणे वेळीच रोखायला हवे. यासाठी धर्माचरण करणे आणि धर्मशिक्षण घेणे हेच क्रमप्राप्‍त आहे.

धर्मनिष्‍ठता हवी !

आज हिंदु लोक ठिकठिकाणी पर्यटनासाठी जातात; मात्र तेथे गेल्‍यावरही मंदिरांपेक्षा चर्च, मशिदी यांकडे ते अधिक प्रमाणात आकर्षित होतात. हेच तर अपयश आहे. हिंदूंमधील धर्मभावनांचा र्‍हास झाल्‍याने धूर्त धर्मांध स्‍वत:चे धर्मांतराचे ईप्‍सित साध्‍य करून घेत आहेत. आजच्‍या युगात जसे ‘झटपट पैसे कमवा’ अशी योजना राबवली जाते, त्‍याचप्रमाणे ‘झटपट धर्मांतर करा’ हा धूर्त डाव ‘ऑनलाईन’ खेळांच्‍या माध्‍यमातून साधला जात आहे. ‘धर्म म्‍हणजे काय ?’, हेच ठाऊक नसणारी हिंदूंची लहान मुले या डावातील ‘बळीचा बकरा’ बनतात. औरंगजेबाने अनन्‍वित छळ करूनही छत्रपती संभाजी महाराजांनी मरेपर्यंत धर्मांतर केले नाही. असंख्‍य शारीरिक वेदना सहन करत त्‍यांनी प्राणत्‍याग केला; म्‍हणूनच ते खरे धर्मनिष्‍ठ ठरले. असा मोठा आदर्श हिंदू आपल्‍यासमोर कधी ठेवणार ? धर्मपरिवर्तनाच्‍या प्रसंगातून हिंदूंनी प्रेरणा घेऊन धर्मांतराचे हे भीषण षड्‍यंत्र नष्‍ट करण्‍यासाठी पुढाकार घ्‍यायला हवा. तसे झाल्‍यासच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या गौरवशाली इतिहासाचे हिंदू हेच खरे शिलेदार ठरतील ! हिंदु धर्म जपणे, जोपासणे आणि जतन करणे हे हिंदूंचे धर्मकर्तव्‍य आहे. ‘ऑनलाईन’ खेळांचे असणारे राष्‍ट्र आणि धर्म घातकी धोके पहाता हे खेळ हिंदूंना रसातळालाच नेणार आहेत. त्‍यामुळे अशा प्रकारच्‍या खेळांवर सरकारने बंदी आणायला हवी, यासाठी हिंदूंनीच पुढाकार घ्‍यावा.

हिंदु मुलांमध्‍ये भिनवले जाणारे हिंदुद्वेषाचे विष रोखण्‍यासाठी धर्माचरण करणे आणि धर्मशिक्षण घेणे हाच पर्याय !