शरद पवार यांचा हिंदुद्वेष !

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर दौर्‍यावर गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा राज्यात वारंवार होणार्‍या धार्मिक-जातीय तणावाच्या घटनांविषयी ‘आपल्या पक्षाला लाभ होईल’, अशा पद्धतीने वक्तव्य केले आहे. राज्य सरकारवर टीका करतांना शरद पवार म्हणाले, ‘‘संगमनेर आणि कोल्हापूर येथील घटना जाणूनबुजून घडवल्या जात आहेत. राज्य सरकारच अशा घटनांना प्रोत्साहन देत आहे. कुणीतरी भ्रमणभाषवर संदेश पाठवतो. त्यावरून लगेच रस्त्यावर उतरून अशा घटनेला धार्मिक स्वरूप देणे योग्य नाही. सत्ताधार्‍यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही. ओडिशा आणि काही राज्यांत चर्चवर आक्रमणे केली जात आहेत. ख्रिस्ती समाज हा शांतताप्रिय आहे. देशात सध्या मुसलमान आणि ख्रिस्ती समाजांना मिळणारी वागणूक चिंताजनक आहे. त्यांच्यावर आक्रमणे होत आहेत.’’ असे वक्तव्य करून पवार यांनी मुसलमान आणि ख्रिस्ती समाजाची मते स्वपक्षाच्या पारड्यात पाडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘लव्ह जिहाद’सारख्या फाजील प्रश्नांना महत्त्व दिले जात आहे, राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याकडे लक्ष द्यायला हवे’, असेही ते म्हणाले.

वर्ष २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा राजकारण्यांकडून मुसलमान किंवा ख्रिस्ती समाजातील एकगठ्ठा मतांसाठी असे वक्तव्य होत असते. त्यात नवल काहीच नाही. प्रत्यक्षात वस्तूस्थितीला धरून विचार केला, तर शरद पवार यांच्या बोलण्यात तथ्य किती आहे ? आतापर्यंत अमरावती, छत्रपती संभाजीनगर, संगमनेर, नगर, अकोला, जळगाव अशा शहरांत झालेल्या दंगलींमध्ये धर्मांध मुसलमानांचाच हात होता, हे सिद्ध झाले आहे. यामध्ये अनेक हिंदूंची दुकाने आणि वाहने यांची तोडफोड करून लक्षावधी रुपयांची हानी झाली, ‘लव्ह जिहाद’च्या घटनांमध्ये हिंदु तरुणीसह ख्रिस्ती तरुणींवरही अत्याचार करण्यात आले होते. त्याविषयी शरद पवार मूग गिळून गप्प का आहेत ?

हिंदुद्वेषाचे राजकारण

शरद पवार कधीही एकरेषीय राजकारण करत नाहीत. सत्ता त्यांचा ‘वीक पॉईंट’ आहे. त्यामुळे ५ दशकांहून अधिक काळ त्यांनी राजकारण केले, ते प्रामुख्याने ‘सत्ताकारणच’ आहे. काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी लक्षावधी हिंदूंचा केलेला नरसंहार, विस्थापित झालेल्या साडेचार लाख हिंदूंविषयी शरद पवार काहीच बोलत नाहीत; कारण त्यांचे असलेले मुसलमानांवरील प्रेम ! ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाविषयी शरद पवार म्हणाले, ‘‘काही लोकांनी एक मोहीम चालू केली आहे. काश्मीरमधून काश्मिरी पंडितांचा एक घटक निघून गेला. त्यावर एक चित्रपट आला आहे. या चित्रपटातून मन जोडण्याऐवजी ‘मने विचलित कशी होतील ?’, हे पाहिले गेले. यासह ‘समाजासमाजांत अंतर कसे वाढेल ?’, ‘द्वेष कसा वाढेल ?’, या प्रकारची मांडणी करण्यात आली. जेव्हा समाजात विद्वेष वाढवण्याची भूमिका कुणी मांडत असेल आणि ती भूमिका चित्रपटात सांगितली गेली असेल, तो चित्रपट अतिशय चांगला आहे, पाहिला पाहिजे, असे जर देशाचे पंतप्रधान म्हणत असतील, तर सामाजिक एकवाक्यता टिकवायची कशी, ठेवायची कशी ?’’ शरद पवार यांच्या वक्तव्याची थोडी चिकित्सा केली, तर असे लक्षात येते की, शरद पवार ‘काश्मीरमधून हिंदू निर्वासित झाले आहेत’, असे म्हणत नाहीत. ‘काश्मिरी पंडितांचा एक घटक निघून गेला,’ असे म्हणतात. ‘तो का निघून गेला ?’, हे शरद पवार सांगत नाहीत. काश्मीरमधील तेव्हाच्या आणि आताच्याही जिहादी आतंकवादाविषयी शरद पवार काही बोलत नाहीत. त्यांचा राग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपटाची प्रशंसा केली म्हणून आहे. नेहमी व्यक्तीस्वातंत्र्याविषयी गळा काढणारे आता गप्प बसले आहेत, यावरही पंतप्रधानांनी भाष्य केले होते. शरद पवारांना यातील काहीही आवडलेले नव्हते. शरद पवार यांनी ‘सामाजिक एकवाक्यता टिकवायची कशी आणि ठेवायची कशी ?’, याविषयी चिंता व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी अलीबागच्या बैठकीत ‘हिंदु आतंकवाद’ असा शब्दप्रयोग केला होता. ‘या देशात केवळ मुसलमान आतंकवादी आहेत असे नाही, तर आतंकवादी हिंदूही आहेत’, हे त्यांनी त्या वेळी मांडले. त्यांच्या या वक्तव्याला २५ वर्षांहून अधिक काळ लोटला असेल, यानंतर भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर, पुरोहित आदी लोकांना अटक झालेली आहे आणि त्यांच्यावर बाँबस्फोटाचे गंभीर आरोप ठेवण्यात आले. हेमंत करकरे यांनी प्रज्ञा ठाकूर यांचा भरपूर छळ केला. ते शरद पवार यांचे निकटवर्ती मानले जात. असे शरद पवार तेव्हा काश्मिरी पंडितांच्या म्हणजे हिंदूंच्या पलायनाविषयी चकार शब्दही बोलत नव्हते. सामाजिक एकवाक्यतेची चिंता ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्दप्रयोग करून व्यक्त होत नाही. यामुळे जे या देशाचे मालक आहेत, ते हिंदू, आपल्याच देशात आतंकवादी ठरवले जातात.

मुसलमानांचे दायित्व!

सामाजिक एकवाक्यतेचे दायित्व सर्व समाजाचे आहे. काश्मीरमधील हिंदूंच्या हत्येविरुद्ध मुंबईत किंवा महाराष्ट्रात मुसलमान समाजाने मोर्चा काढल्याची बातमी कधी आली नाही. कोणताही मुल्ला किंवा मौलवी याने काश्मिरी हिंदूंची हत्या करणार्‍याविरुद्ध फतवा काढलेला नाही. शरद पवार केवळ ‘सामाजिक एकवाक्यता’ असा शब्दप्रयोग करतात, त्यांना हिंदू आणि मुसलमान यांचे ऐक्य अभिप्रेत आहे. हे ऐक्य जर व्हायचे असेल, तर सर्वांत मोठे दायित्व मुसलमान समाज, त्यांचे धर्मगुरु आणि त्यांचे राजकीय नेते यांच्यावर येते. या सर्व लोकांनी सामाजिक ऐक्य राखायचे असेल, तर सक्रीय भूमिका घ्यायला पाहिजे. जिहादी आतंकवादाचा निषेध केला पाहिजे. ‘लव्ह जिहाद’ बंद केला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी हिंदूंवर अत्याचार होईल, त्या त्या ठिकाणी अत्याचार करणार्‍यांचा निषेध केला पाहिजे. शरद पवार यांनी मुल्ला आणि मौलवी यांना घेऊन त्यांचे नेतृत्व केले पाहिजे आणि निषेधाचे पत्रक काढले पाहिजे. सामाजिक एकवाक्यतेची ही सर्वांत ‘महान’ सेवा ठरेल !

‘हिंदु आतंकवाद’ असा शब्दप्रयोग करून मुसलमानांची एकगठ्ठा मते मिळवू पहाणारे राजकारणी समाजासाठी धोकादायक !