‘दळणवळण बंदीच्‍या काळात साधकांनी निराश न होता साधना करावी’, या तळमळीमुळे सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांनी कर्नाटक राज्‍यातील साधकांचा घेतलेला ‘ऑनलाईन’ भाववृद्धी सत्‍संग अन् या सत्‍संगाचा साधकांना झालेला अपूर्व लाभ !

‘वर्ष २०२१ मध्‍ये कोरोनामुळे दळणवळण बंदी लागू करण्‍यात आली होती. दळणवळण बंदी चालू झाल्‍यानंतर साधक समष्‍टी सेवा करण्‍यासाठी घराबाहेर जात नव्‍हते. काही साधक वयस्‍कर होते. त्‍यांना बाहेर जाऊन सेवा करण्‍याची भीतीही वाटत होती. ‘या आपत्‍काळात सर्व साधकांची साधना वेगाने व्‍हावी’, यासाठी पू. रमानंदअण्‍णांनी (पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे संत, वय ४७ वर्षे) यांनी) कर्नाटकातील सर्व साधकांसाठी ‘ऑनलाईन’ भाववृद्धी सत्‍संग घेतला. हा सत्‍संग २८.२.२०२१ ते १५.३.२०२१ या कालावधीत प्रतिदिन सकाळी ७.३० ते ८ या वेळेत होत होता. साक्षात् संतवाणीतून होणार्‍या या सत्‍संगाचा लाभ ७०० हून अधिक साधकांनी घेतला. पू. रमानंदअण्‍णांनी घेतलेल्‍या भाववृद्धी सत्‍संगामुळे साधकांमध्‍ये झालेले पालट अन् त्‍यांना आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.          

(भाग १)

१. पू. रमानंद गौडा यांनी घेतलेला ‘ऑनलाईन’ भाववृद्धी सत्‍संग !

पू. रमानंद गौडा

१ अ. पू. रमानंदअण्‍णांनी सत्‍संगातील साधकांची भाववृद्धी होण्‍यासाठी त्‍यांच्‍याकडून भावजागृतीचे निरनिराळे प्रयोग करून घेणे : पू. अण्‍णांनी ‘साधकांना साधनेच्‍या दृष्‍टीने लाभ व्‍हावा आणि साधकांची भाववृद्धी व्‍हावी’, यासाठी सत्‍संगात प्रतिदिन निरनिराळे विषय घेतले, उदा. ‘गुरुदेवांची (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची) पाद्यपूजा करणे, हृदयमंदिरात गुरुपादुकांची स्‍थापना करणे, सप्‍तचक्रांचे शुद्धीकरण करणे, राधा, मीरा आणि गोपी यांची श्रीकृष्‍णाप्रतीची भक्‍ती अनुभवणे, श्री गुरूंना आर्तभावाने प्रार्थना करणे, गुरुमाऊलीची साधकांवरील प्रीती’ इत्‍यादी. हा सत्‍संग संत घेत असल्‍याने त्‍यात सांगितला जाणारा भावजागृतीचा प्रयोग प्रत्‍येक साधकाच्‍या अंतर्मनापर्यंत जात होता आणि साधकांना ते सर्व अनुभवता येत होते.

सौ. मंजुळा गौडा

१ आ. पू. अण्‍णांनी साधकांना गुणवृद्धी आणि स्‍वभावदोष-निर्मूलन यांसाठी ध्‍येय ठेवून प्रयत्न करण्‍यास सांगणे अन् त्‍यानुसार प्रयत्न केल्‍यावर साधकांना स्‍फूर्ती मिळणे : पू. अण्‍णांनी ‘स्‍वभावदोष आणि अहं यांमुळे साधकांना ध्‍येयाप्रत पोचण्‍यात अडथळे कसे निर्माण होतात ?’, हे सांगून ‘प्रयत्न केल्‍यास ते अडथळे पार करून आपण ध्‍येयापर्यंत कसे पोचू शकतो ?’, याविषयी साधकांना अवगत केले. ‘साधकांच्‍या साधनेत सातत्‍य निर्माण व्‍हावे आणि त्‍यांच्‍यातील स्‍वभावदोषांचे निर्मूलन होऊन गुणवृद्धी व्‍हावी’, यांसाठी त्‍यांनी प्रतिदिन साधकांना वेगवेगळे ध्‍येय देऊन त्‍यावर प्रयत्न करण्‍यास सांगितले, उदा. ‘जो गुण अल्‍प आहे, तो वाढवणे आणि तीव्र असलेला स्‍वभावदोष दूर करण्‍यासाठी प्रयत्न करणे.’ तसे प्रयत्न केल्‍यावर साधकांना स्‍फूर्ती मिळाली. अशा वेळी ‘देव साहाय्‍यासाठी धावून येतो’, हेही पू. अण्‍णांनी उदाहरणासहित विस्‍ताराने समजावून सांगितले.

१ इ. पू. अण्‍णांनी पहाटे ४ वाजता उठून सत्‍संगाच्‍या विषयाची सिद्धता करणे, त्‍यांनी स्‍वतः भाव अनुभवून सत्‍संगात भावजागृतीचा प्रयोग सांगणे आणि त्‍यामुळे साधकांना त्‍याचा लाभ होणे : ‘साधकांमधील स्‍वभावदोष आणि अहं दूर होऊन त्‍यांची व्‍यष्‍टी अन् समष्‍टी साधना चांगली व्‍हावी आणि सर्व साधकांची तळमळ वाढावी’, अशी पू. अण्‍णांची पुष्‍कळ तळमळ होती. त्‍यांच्‍या या तळमळीमुळे ते पहाटे ४ वाजता उठून सत्‍संगात घ्‍यायच्‍या विषयाची सिद्धता करत होते. विषयाचा अभ्‍यास करतांना ते स्‍वतः तो भाव अनुभवून कित्‍येक वेळ गुरुदेवांच्‍या अनुसंधानात रहात असत. ते स्‍वतः तो भाव अनुभवून मग भाववृद्धी सत्‍संगात भावजागृतीचा प्रयोग सांगत होते. त्‍यामुळे सर्व साधकांना पुष्‍कळ लाभ झाला. त्‍यांनी सांगितलेला प्रत्‍येक विषय साधकांच्‍या अंतर्मनापर्यंत गेला. त्‍या वेळी संपूर्ण वातावरणच भावमय झालेले असायचे.’

– सौ. मंजुळा गौडा (पू. रमानंद गौडा यांच्‍या पत्नी, आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के), मंगळुरू, कर्नाटक. (१६.८.२०२१)

२. पू. रमानंद गौडा यांनी घेतलेल्‍या भाववृद्धी सत्‍संगामुळे साधकांमध्‍ये झालेले पालट

२ अ. सौ. मंगला जाधव, बेळगाव

१. ‘पू. अण्‍णांच्‍या मार्गदर्शनामुळे मला वर्तमानात आणि सकारात्‍मक रहाता येत आहे.

२. प्रतिदिन त्‍यांच्‍या चैतन्‍यमय वाणीतून सत्‍संग ऐकल्‍याने मला पूर्ण दिवसभर चैतन्‍य जाणवते.

३. आता मी प्रत्‍येक गोष्‍ट विचारून करते.

४. मला ‘इतरांसह अनावश्‍यक बोलू नये’, असे वाटते.

५. पूर्वी कुणी माझी चूक सांगितली, तर मला राग येत असे. आता ‘माझा राग न्‍यून होत आहे’, असे मला जाणवते. मला गुरुदेवांविषयी पुष्‍कळ कृतज्ञता वाटते.’

२ आ. सौ. प्रतीक्षा पै, बेंगळुरू

१. ‘सत्‍संग ऐकायला प्रारंभ केल्‍यावर माझी निराशा आणि नकारात्‍मकता न्‍यून होऊ लागली. पुष्‍कळ दिवसांपासून मला ‘जेवणखाण आणि काहीच नको’, असे वाटायचे. आता माझी स्‍थिती सुधारली आहे.

२. माझे व्‍यष्‍टी साधनेकडे दुर्लक्ष होत होते. सत्‍संगांनंतर माझ्‍याकडून भावाच्‍या स्‍थितीत रहाण्‍याचे प्रयत्न होत आहेत. माझ्‍या मनाची गोंधळलेली अवस्‍थाही न्‍यून होत आहे.’

२ इ. सौ. स्‍वर्णलता, बेंगळुरू

१. ‘माझ्‍या नामजपात वाढ झाली.

२. घरच्‍यांकडून असलेल्‍या माझ्‍या अपेक्षा न्‍यून झाल्‍या.

३. ‘गुरुदेव आमच्‍या घरी येत असून ते मला पहात आहेत’, असे मला वाटते. घरी पुष्‍कळ शांत जाणवते.’

२ ई. श्रीमती पुष्‍पराज, बेंगळुरू

१. ‘सत्‍संग चालू झाल्‍यापासून मला कुठलाही प्रसंग मनमोकळेपणाने सांगता येत आहे.

२. माझे साधकांच्‍या स्‍वभावदोषांकडे लक्ष गेल्‍यास मी लगेच अंतर्मुख होऊन त्‍यांचे गुण पहाण्‍याचा प्रयत्न करते. (क्रमशः)

३. कुठलीही सेवा सांगितली, तरी मी ती परिश्रमपूर्वक करण्‍याचा प्रयत्न करते.

४. प्रत्‍येक साधकाकडे ‘गुरुबंधू’ म्‍हणून पहाण्‍याचा प्रयत्न करते.

५. पू. अण्‍णांच्‍या या सत्‍संगाने ‘माझ्‍यात साधनेने पालट झालाच पाहिजे आणि हा जीव गुरुचरणी समर्पित झालाच पाहिजे’, असे मला मनापासून वाटले.’

(क्रमशः)

(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.८.२०२१)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/689479.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक