ज्येष्ठांना विमानाद्वारे तीर्थक्षेत्रांच्या विनामूल्य दर्शनाची मध्यप्रदेश शासनाची व्यवस्था !

भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’च्या अंतर्गत ‘वायुयान से तीर्थयात्रा’ (विमानाद्वारे तीर्थयात्रा) या उपक्रमाचा २१ मे या दिवशी शुभारंभ केला. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना देशातील प्रयागराज, शिर्डी, मथुरा-वृंदावन आणि गंगासागर धाम यांचे विनामूल्य दर्शन करता येणार आहे. २१ मे या दिवशी मुख्यमंत्री चौहान यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांचा पहिला गट भोपाळ विमानतळावरून प्रयागराजसाठी मार्गस्थ झाला. यामध्ये ३२ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. अशा प्रकारे १९ जुलै २०२३ पर्यंत २५ विमान यात्रांद्वारे राज्यातील २५ जिल्ह्यांतील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्री नेण्यात येणार आहे.

या प्रसंगी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना उद्देशून चौहान म्हणाले, ‘‘व्यक्तीला आध्यात्मिक शांतता हवी असते. या दृष्टीने मी केलेला संकल्प आज पूर्ण झाला. श्रीरामाच्या कृपेने आपण तीर्थक्षेत्रांचे दर्शन कराल आणि आपले आशीर्वाद मध्यप्रदेशला मिळतील.’’

संपादकीय भूमिका

मध्यप्रदेश शासनाचा स्तुत्य उपक्रम ! कुणा कथित धर्मनिरपेक्षतावाद्याने या उपक्रमावरून ‘भगवेकरण’ चालू असल्याची ओरड केल्यास आश्‍चर्य वाटू नये !