सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाला अनेक मान्यवर आणि हितचिंतक उपस्थित होते. त्यांपैकी धनबाद, झारखंड येथील उद्योजक आणि सनातनचे संत पू. प्रदीप खेमका, त्यांची पत्नी पू. (सौ.) सुनीता खेमका, देहली येथील उद्योजक आणि सनातनचे संत पू. संजीवकुमार, ‘पितांबरी’ उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि मडिकेरी, कर्नाटक येथील अधिवक्ता कृष्णमूर्ती पंजीतडका (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांनी सोहळ्याच्या अंतिम सत्रात भावपूर्ण मनोगत व्यक्त केले.
सोहळ्याला उपस्थित रहाण्याची संधी दिल्याविषयी तीनही गुरूंच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता ! – पू. (सौ.) सुनीता खेमका, झारखंड
साधनेला आरंभ करण्यापूर्वी मला एकटेपणा जाणवायचा. साधनेत आल्यानंतर तो पूर्णतः निघून गेला. आता बाहेरचे लोक मला विचारतात की, तुम्ही एकट्याच कशा रहाता ? तुम्हाला एकटेपणा जाणवत नाही का ? तेव्हा मला सांगावेसे वाटते, ‘‘मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्तित्व सतत अनुभवावयास मिळते. ते नेहमी सोबत असल्याचे जाणवते. मला असे वाटते की, मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासमवेत सेवा करत आहे.’’ या सोहळ्याला उपस्थित रहाण्याची संधी दिल्याविषयी तिन्ही गुरूंच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे केवळ माझेच नाही, तर सर्व साधकांचे रक्षणकर्ते आहेत ! – उद्योजक आणि सनातनचे संत पू. प्रदीप खेमका, झारखंड
‘माझ्या शरिरातील पेशीन् पेशी सतत ‘श्री गुरवे नमः ।’ हाच नामजप करत असतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे केवळ माझेच नाही, तर सर्व साधकांचे रक्षणकर्ते आहेत. माझे जीवन एखाद्या अधिकोषाच्या व्यवस्थापकासारखे आहे. अधिकोषात पुष्कळ रक्कम असते; मात्र व्यवस्थापकाचा त्यावर काही अधिकार नसतो. तसे माझे अनेक व्यवसाय आहेत; मात्र ते सगळे व्यवसाय गुरुकृपेने सांभाळले जातात. अनेक व्यवसायांच्या ठिकाणी मी वर्ष-वर्ष फिरकतही नाही; तरीही गुरु सर्व काळजी घेतात. गुरुदेवांच्या चरणी एकच भाव अर्पण करावा वाटतो,
असुवन के धारों से नीत पांव पथारू मैं ।
गुरुदेव के चरणों में नीत शीश झुकाऊं मैं ।।
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगा’त भारताला विश्वगुरु बनवण्याचे सामर्थ्य ! – श्री. रवींद्र प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, ‘पितांबरी’ उद्योगसमूह, ठाणे.
१. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगामध्ये भारताला विश्वगुरु बनवण्याचे सामर्थ्य आहे. ‘जगातील ८०० कोटी लोकसंख्येसाठी तितकेच साधनामार्ग आहेत’आणि ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’ हे साधनेचे अद्भुत सिद्धांत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले आहेत. या सिद्धांतामुळे हिंदु धर्मात किती साधनास्वातंत्र्य आहे, ते स्पष्ट होते आणि हिंदु धर्माची महानताही लक्षात येते. १ सहस्र वर्षांत सनातन संस्थेसारखी एखादीच संस्था निर्माण झाली आहे.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘स्थुलातून सूक्ष्मात जाणे’ हे साधनेचे एक तत्त्व सांगितले आहे. त्यानुसारच मी ‘पितांबरी’च्या संशोधन आणि विकास (रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट) विभागाला कार्य करण्यास सांगितले आहे. अध्यात्माची शक्ती इतकी आहे की, साधनेमुळे आनंदप्राप्ती होते आणि प्रारब्ध पालटू शकते. शिक्षण वा व्यवस्थापन यांच्यापेक्षा अध्यात्माची तत्त्वे श्रेष्ठ आहेत.
३. आम्हाला या कार्यक्रमाला येण्याचा निरोप मिळाला, तेव्हा रुग्णाईत असलेल्या माझ्या आईची प्रकृती सुधारली. महामार्गावर सहस्रो वाहनांमुळे रस्ता बंद (ट्रॅफिक जाम) असतांना केवळ आमच्या वाहनाला येण्यासाठी रस्ता मिळाला. हे सर्व गुरुकृपेने झाले आहे.
४. मी कोरोनामुळे रुग्णाईत होतो. माझा आत्मविश्वासच नष्ट झाला होता, तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे माझ्या स्वप्नात आले. त्यांनी माझा आत्मविश्वास वाढवला आणि माझा एक प्रकारे पुनर्जन्मच झाला.
५. आम्ही ‘पितांबरी’ला गुरुचरणी अर्पण केले आहे. तेच ‘पितांबरी’ आणि प्रभुदेसाई कुटुंबाचा योगक्षेम वहात आहेत. तेच आमचे कल्याणही करणार आहेत.
पूर्वनियोजित कार्यक्रमापेक्षा गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाला प्राधान्य देणारे श्री. रवींद्र प्रभुदेसाई !ताम्हाणे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथे पितांबरी आस्थापनाच्या वतीने सुगंधी फुले देणार्या रोपांची, तसेच वनौषधींची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. त्या गावात पितांबरीचा अगरबत्ती निर्मितीचा प्रकल्पही आहे. तेथे ११ मे २०२३ या दिवशी नूतन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण या कार्यक्रमांना पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई पूर्वनियोजनाप्रमाणे उपस्थित रहाणार होते; परंतु त्याच दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम गोवा येथे असल्याचे त्यांना कळल्यावर त्या कार्यक्रमाला उपस्थित रहाता यावे, यासाठी त्यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमाच्या आयोजकांना त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाता येणार नसल्याविषयी क्षमा मागून ‘१०-१५ दिवसांनी मंदिराला भेट देण्यासाठी येणार’, असे कळवले. त्यानंतर ते गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाला सहकुटुंब उपस्थित राहिले. |
गुरुदेवांनी आपल्याला अनमोल साधना शिकवली ! – पू. संजीवकुमार, देहली
मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे श्रीविष्णुरूपात, तर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनुक्रमे ब्रह्मा अन् महेश यांच्या रूपात दर्शन झाले. या तीनही गुरूंच्या चरणी सूक्ष्म ज्ञानाची अनुभूती येते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने माझ्या अनेक समस्या सुटल्या आहेत. सनातनच्या साधकांना तोड नाही. त्यांच्या माध्यमातून गुरूंचेच व्यापक रूप कार्यरत आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आपल्याला अनमोल साधना शिकवली आणि इतके चांगले साधक दिले, याविषयी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांसाठी मोक्षद्वार उघडले आहे ! – अधिवक्ता कृष्णमूर्ती, कर्नाटक (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के)
‘या भावजागृतीकारक सोहळ्याला मला उपस्थित रहाता आले, यासाठी माझे मन भरून आले आहे. जेव्हा मला हिंदुत्वनिष्ठांसाठी खटला लढतांना ‘प्रतिवाद्यांना कोणते प्रश्न विचारायचे ?’, हे सुचत नाही किंवा मी थकून जातो, तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शरण जातो. १२.४.२०२३ च्या रात्री मड्डीकेरी येथून चारचाकी वाहनाने जात असतांना काही जणांनी माझ्यावर प्राणघातक आक्रमण केले. त्या वेळी बंदुकीची एक गोळी माझ्या डोक्यापासून २-३ सें.मी. अंतरावरून गेली. माझ्या गाडीची गती अल्प असल्याने गोळी मला लागली नाही. त्या वेळी गाडी अल्प गतीने चालवण्याची सुबुद्धी मला गुरूंनीच दिली. माझा नामजप सतत होत नसतांनाही गुरु माझी किती काळजी घेतात ! त्यांनी साधकांसाठी मोक्षद्वारच उघडले असल्याने त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. ‘त्यांच्या कृपेने मला हिंदुत्वाचे कार्य अधिकाधिक करता येऊ दे’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.’
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संत, अधिवक्ता आणि धर्मप्रेमी यांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |