सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले संगीत संशोधन !‘हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती अंधश्रद्धेच्या पायावर उभी आहे’, असा अपप्रचार केला जातो. त्याला चोख उत्तर देण्यासाठी विविध प्रकारचे संशोधन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. हिंदुस्थानचे शास्त्रीय संगीत जगातील सर्वांत श्रेष्ठ संगीत मानले जाते. शास्त्रीय संगीतातील विविध राग मानवाच्या व्याधी, मानसिक ताण तणाव दूर करण्यासाठी उपयोगात येऊ शकतात. त्या दृष्टीने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने संशोधन केले जात आहे.’ – श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, व्याख्याते आणि लेखक (१८.४.२०२३) |
‘मलाही माझ्या कार्याबद्दल लिहिता आला नसता असा परिपूर्ण आणि अप्रतिम लेख श्री. दुर्गेश जयवंत परुळकर यांनी लिहिला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानावे, तेवढे थोडे !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले |
१. ब्रिटिशांच्या प्रभावामुळे हिंदु धर्म आणि संस्कार यांपासून दुरावलेला हिंदु समाज !
आपल्या देशातील वीर पुत्रांनी ब्रिटिशांशी सशस्त्र संघर्ष करून भारतमातेच्या हाता-पायांतील पारतंत्र्याच्या शृंखला खळाखळा तोडून तिला मुक्त केले. आपला देश स्वतंत्र झाला; पण त्याचे विभाजनही झाले. इंग्रजांच्या प्रभावाखाली वावरणार्या आपल्या देशातील सत्ताधारी लोकांनी इंग्रजांची शिक्षणपद्धत तशीच पुढे चालू ठेवली. आपल्या धर्माचे आणि आपल्या संस्कृतीचे संस्कार करण्याची मोकळीक हिंदूंच्या कोणत्याही शिक्षण संस्थेला देण्यात आली नाही. हिंदु समाज स्वतःच्याच धर्मापासून आणि संस्कृतीपासून दूर जाऊ लागला. त्याला आपल्या धर्मातील आणि संस्कृतीतील साध्या साध्या गोष्टीसुद्धा ठाऊक नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली. पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करत आपला समाज जीवन जगत राहिला. आजही थोड्याफार प्रमाणात तो तसेच जगत आहे. कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते यांनी आपापल्या परीने आपली संस्कृती, आपला धर्म, आपला इतिहास लोकांपर्यंत पोचवण्याचे काम केले; पण त्यांचे हे कार्य व्यक्तीगत पातळीवर होते.
राष्ट्रीय उभारणीच्या कार्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फार मोठे योगदान आहे’, हे विसरून चालणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यास वर्ष १९२५ मध्ये आरंभ झाला. आणि स्वातंत्र्योत्तर अशा दोन वेगळ्या कालखंडांमध्ये रा.स्व. संघाने केलेले कार्य आपल्या सर्वांसमोर आहे. स्वातंत्र्यानंतर देशाला अनेक संकटांतून जावे लागले. देश स्वतंत्र झाला, तोच देशाचे विभाजन होऊन ! त्यानंतर पाकिस्तानशी चार वेळा युद्धे झाली, तर चीनशी एकदा युद्ध झाले. त्यानंतरही छोट्या-मोठ्या चकमकी होतच राहिल्या. पाकिस्तानने छुपे युद्ध चालू केले. अनुनय करण्याकडे राजकीय सत्ता सातत्याने झुकत होती. बहुसंख्य असलेल्या हिंदु समाजाला सावत्रपणाची वागणूक मिळत राहिली. या अन्यायाच्या विरोधात लढणार्या राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद इत्यादी संघटना उघडपणे हिंदूंचा पक्ष घेऊन काम करत होत्या अन् आजही करत आहेत.
२. डॉ. जयंत आठवले यांचा धार्मिक आणि आध्यात्मिक क्षितिजावर उदय !
देशातील राजकीय-सामाजिक वातावरण पालटत चालले होते. अस्तित्वात असलेल्या हिंदु संघटना त्यांच्या परीने काम करत होत्या, तरीसुद्धा देशातील परिस्थिती सावरण्यासाठी योग्य सत्ताधीश आपल्या देशात आढळत नव्हते. देशात आतंकवादाचे वातावरण वाढत चालले. बाँबस्फोटांच्या मालिका घडत राहिल्या. मुसलमानांचे तुष्टीकरण करण्यात देशातील राजकीय पक्षांमध्ये जणू स्पर्धा चालू झाली. अशा सामाजिक, राजकीय आणि धार्मिक पार्श्वभूमीवर डॉ. जयंत बाळाजी आठवले या नावाच्या एक व्यक्तीने इंग्लंडला जाऊन ‘मानसशास्त्र’ या विषयावर संशोधन केले. ‘संमोहनशास्त्रातील तज्ञ’ म्हणून ओळखली जाणारी ही व्यक्ती देशाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक क्षितिजावर उदयास आली. ज्या गोष्टी शिक्षणव्यवस्थेतील निर्बंधांमुळे करता येत नाहीत, त्या सर्व करण्यासाठी २३ मार्च १९९९ या दिवशी सनातन संस्थेची स्थापना करून त्यांनी आपल्या कार्याचा आरंभ मुंबई आणि गोवा या भागांत केला. त्यांच्या कार्याचे प्रेरणास्थान होते त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज ! अशा अलौकिक गुणांनी युक्त असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्म वैशाख कृष्ण सप्तमी, कलियुग वर्ष ५०४४, म्हणजेच ६ मे १९४२ या दिवशी रायगडमधील नागोठणे या गावी झाला.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची ज्ञानार्जनाची तळमळ आणि कलासक्ती अमर्याद आहे. चित्रकलेच्या ‘एलिमेंट्री’ आणि ‘इंटरमीजिएट’ या परीक्षांत त्यांनी लीलया यश संपादन केले. संवादिनी, माऊथऑर्गन अशा प्रकारची वाद्ये ते वाजवायचे. त्यांना ‘फोटोग्राफी’ (छायाचित्रीकरण) आणि जलतरण यांची विशेष आवड आहे. त्यांनी वैद्यकशास्त्रातील ‘एम्.बी.बी.एस्.’ पदवी मुंबईत संपादन केली आहे.
३. डॉ. आठवले यांची गुरुभेट आणि श्रीगुरूंनी त्यांना दिलेला आशीर्वाद !
मानसशास्त्र आणि संमोहन उपचारशास्त्र यांचा उपयोग करूनही रुग्ण बरे होत नसल्याचे डॉ. आठवले यांना आढळून आल्यावर ते आध्यात्मिक अभ्यासाकडे वळले. हा अभ्यास करण्यासाठी त्यांनी प.पू. मलंगबाबा, प.पू. विद्यानंद, प.पू. अण्णा करंदीकर, प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडे जाऊन एकलव्याच्या एकाग्रतेने अध्यात्मज्ञान संपादन केले. वर्ष १९९५ मध्ये अध्यात्माचे धडे घेत असतांना डॉ. आठवले हे त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त इंदूरला जाऊन राहिले. वेळी महाराजांनी त्यांना भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे महात्म्य कथन केले. एवढेच नाही, तर श्रीकृष्ण आणि अर्जुन असलेला चांदीचा एक रथ त्यांना दिला आणि सांगितले, ‘‘गोव्याला आपले कार्यालय होईल, तिकडे ठेवा.’’ प.पू. भक्तराज महाराज यांचा हा आशीर्वाद सनातन संस्थेच्या स्थापनेसाठी आणि पुढील कार्यासाठी फलदायी ठरला. सद़्गुरूंच्या कृपेचा सोपा, सहज आणि जलद गतीने आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरणारा योग, म्हणजेच ‘गुरुकृपायोग’ डॉ. आठवले यांनी सर्वांना सांगितला. तो त्यांनी स्वतः आचरणात आणला आणि इतरांकडून करवून घेतला.
४. आध्यात्मिक क्षेत्रांत स्वतःचा ठसा उमटवणारी सनातन संस्था !
सनातन संस्थेचा डोलारा हा गुरुकृपायोगाच्या भक्कम पायावर उभा आहे. या संस्थेने राजकारण, शिक्षण, अध्यात्म, विज्ञान, संगीत, कला, साहित्य, स्वसंरक्षण, सामाजिक कार्य, या आणि अशा विविध क्षेत्रांत आपला स्वतःचा ठसा उमटवला आहे. मानवाच्या भौतिक जीवनासाठी उपयुक्त असलेल्या काही पूजोपयोगी आणि नित्योपयोगी वस्तूंची निर्मिती करण्याचे दायित्वसुद्धा सनातनने यशस्वीपणे पार पाडले आहे. आधुनिक विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग हिंदु संस्कृती अन् अध्यात्म यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मुक्तहस्ते करणारी ही आध्यात्मिक संस्था आहे.
आध्यात्मिक क्षेत्रात विविध प्रकारचे प्रयोग करून त्याची सत्यता विज्ञानाच्या कसोटीवर विशद करण्याचे संशोधनात्मक काम सनातन संस्था गेली अनेक वर्षे करत आहे. हेच या संस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. सनातन संस्थेचे सर्व साधक, अभ्यासक, वितरक, स्वयंसेवक कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता कार्य करत आहेत. डॉ. आठवले यांनी प्रारंभीपासून जी कार्यपद्धत आखून दिली आहे, त्या कार्यपद्धतीच्या मर्यादेत राहून सनातन संस्था धडाडीने कार्य करत आहे. ‘साधनेद्वारे आपण स्वतःचा उद्धार करू शकतो, त्यासमवेत आपण समाजाचाही उद्धार करू शकतो’, अशा प्रकारची शिकवण सर्व अनुयायांना (साधकांना) देण्याचे महान कार्य सच्चिदानंद परब्रह्म पदापर्यंत पोचलेले डॉ. जयंत आठवले यांनी केले आहे.
सनातनने सुमारे १७ भाषांमध्ये विविध विषयांवरचे ग्रंथ प्रकाशित केले आहेत. आपला धर्म काय आहे ? आपल्या धर्माची शिकवण काय आहे ? आपले सण आणि उत्सव कशा प्रकारे आपण साजरे करावे ? सर्व देवतांची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने कशी करावी, यांविषयी सनातन संस्था आपले धर्मबांधव आणि देशबांधव यांना मार्गदर्शन करत आहे.
५. राष्ट्रभक्तीचा आणि साधनेचा नंदादीप प्रत्येकाच्या अंतःकरणात तेवत रहाण्यासाठी आयुष्य खर्ची घालणारे डॉ. जयंत आठवले !
सनातन संस्थेने समाजमनात कर्म, ज्ञान आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. ‘राष्ट्र, समाज, संस्कृती, धर्म यांच्यासाठी निरलस, निरपेक्ष भावनेने कर्म करा. असे कर्म करतांना ज्ञान संपादन करूनच कर्म करा; म्हणजे कोणत्याही प्रकारच्या अडचणींवर मात करता येते’, अशी शिकवण देऊन राष्ट्रभक्तीचा आणि साधनेचा कधीही न विझणारा नंदादीप प्रत्येकाच्या अंतःकरणात तेवत रहावा; म्हणून डॉ. जयंत आठवले यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्यासाठी खर्ची घातले आहे. त्यांची ही तपश्चर्या आज फळाला येत असल्याचे दिसत आहे. हे करतांना या संस्थेला अनेक आरोप-प्रत्यारोपांना सामोरे जावे लागले; पण त्यांनी आपला हा वसा, हे व्रत टाकले नाही. सनातन संस्थेवर बंदी घालण्याचे मनसुबे रचले गेले. लोकांच्या या दुष्प्रवृत्तीला बळी न पडता आपले कार्य तेवढ्याच निष्ठेने आणि प्राणपणाने पुढे चालू ठेवून सनातन संस्थेने टीकाकारांवर मात केली आहे.
सनातन पुरोहित पाठशाळेसारखे उपक्रम चालवून आपल्या कार्याला अध्यात्मशास्त्रीय बैठक देण्याचा आग्रह सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांनी धरला आणि या संस्थांच्या माध्यमातून संशोधनाचे कार्य अखंड चालू आहे. त्यामुळे कोणतीही आव्हाने आणि आक्षेप यांना सामोरे जाण्यासाठी सनातन संस्था आता सक्षम झाली आहे.
६. शांतता आणि प्रसन्नता यांचा संगम असलेले सनातनचे आश्रम !
विज्ञानालाही कोड्यात टाकणार्या काही अकल्पित घटना सनातनच्या आश्रमांत घडलेल्या आहेत आणि घडत आहेत. त्याची प्रचीती सनातनच्या आश्रमांना भेट दिल्याविना येणार नाही. सनातनच्या कोणत्याही आश्रमामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला शांतता आणि प्रसन्नता यांचा संगम झालेला आढळतो. शेकडो साधक आश्रमात रहात असले, तरी कोणत्याही प्रकारचा आवाज, गडबड, गोंधळ आपल्याला ऐकू येत नाही. संपूर्ण परिसर स्वच्छ, नीटनेटका असतो. प्रत्येक जण आपापले काम न चुकता करतो. आश्रमातील व्यवस्थापन जाणून घेण्यासाठी अनेक व्यावसायिक संस्थांनी सनातनच्या आश्रमाला भेट दिली आहे.
७. स्वतःच्या दोषांवर मात करण्याची शिकवण असलेले सनातनचे साधक !
स्वतःत निर्माण झालेले दोष स्वतःच शोधून त्यावर मात करायची’, ही शिकवण सनातन संस्थेचे सर्व अनुयायी काटेकोरपणे कृतीत आणतांना दिसतात. अशा प्रकारची शिस्त अबालवृद्ध सर्वच पाळत असतात. परस्परांविषयी आदराची, प्रेमाची, आपुलकीची भावना सहजतेने जतन करण्याची महान शिकवण सनातन संस्थेच्या साधकांमध्ये विशेषत्वाने आढळते. सनातन संस्थेच्या साधकांमध्ये उथळ विचार आणि उथळ आचार यांना कुठेही स्थान दिले गेलेले नाही. ‘आपण करत असलेले कार्य हे ईश्वराला साक्षी ठेवून करायचे आहे. आपल्याला प्राप्त झालेली विद्या, आपण प्राप्त केलेले ज्ञान हे भारतमातेच्या उत्कर्षासाठी उपयोगात आणायचे’, हा विचार सावरकरांनी या भूमीत रुजवला. याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम अन् तो विचार कृतीत आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न करण्याचे महत्त्वपूर्ण काम सनातनच्या साधकांनी केले आहे. अशा या शिस्तबद्ध कार्याचा परिमल (सुगंध) संपूर्ण विश्वात आता पसरत चालला आहे. देश-विदेशातले अनेक जिज्ञासू सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेल्या अध्यात्माच्या शिकवणीकडे आकर्षित होत आहेत.
हे कार्य सर्वत्र प्रसारित व्हावे, यासाठी त्याला अनुरूप अशी शास्त्रशुद्ध यंत्रणा निर्माण करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त विनम्र प्रणिपात !’
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, व्याख्याते आणि लेखक (१८.४.२०२३)