महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या भव्य आणि व्यापक संकल्पनेवर कार्य करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !   

पू. किरण फाटक

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गायनाकडे एक उपचारपद्धत म्हणून पहाण्याचा दृष्टीकोन देणे

‘परम पूज्य श्री डॉक्टर जयंत आठवले यांच्या संशोधन कार्यात सहभाग घेण्यासाठी मी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात माझे शास्त्रीय गायन सादर केले. गायनाकडे एक उपचारपद्धत म्हणून पहाण्याचा दृष्टीकोन मला येथे दिसून आला. ‘परम पूज्यांनी शारीरिक त्रासांसह वाईट शक्तींमुळे त्रास होतो’, हे जाणले आणि याविषयी त्यांनी साधकांना मार्गदर्शन केले. माझे गायन चालू असतांना अनेक साधकांना वाईट शक्तींमुळे त्रास होत होता; परंतु ‘सात्त्विक अशा शास्त्रीय संगीतामुळे साधकांना होणारा त्रास दूर झाला’, असे मला दिसले. ‘वाईट शक्ती आपला प्रभाव कसा दाखवतात ?’, याचे अनेक दाखले तेथील एका दालनात दाखवले आहेत.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना कलेच्या माध्यमातून साधना शिकवणे

येथे गायन, वादन आणि चित्रकला या कलांसाठी स्वतंत्र दालने आहेत. काही साधक कलाकार साधनेमुळे सूक्ष्मातून दिसणार्‍या शक्तींची चित्रे काढतात. साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार बनवलेली हिंदु देवतांची सात्त्विक चित्रे पाहून माझे मन प्रसन्न झाले.

३. ‘संगीतातून अध्यात्म’ या विषयावरील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचार !

‘संगीतातून अध्यात्म’ या संकल्पनेविषयी सांगतांना ते म्हणाले, ‘‘संगीताच्या शिक्षणातून विद्यार्थ्यांची आध्यात्मिक प्रगती कशी होईल ?’, याचा विचार करून आपण योग्य तो अभ्यासक्रम ठरवला पाहिजे.’’ ‘विद्यार्थ्यांची राष्ट्रीय अस्मिता जागृत करण्याचे काम आपण केले पाहिजे’, असे त्यांचे मत आहे. यासाठी ‘राष्ट्रप्रेमाची विविध छटा असलेली गीते विद्यार्थ्यांना शिकवली जावीत’, असे त्यांना वाटते. त्यांच्या मनात राष्ट्रभक्ती ओतप्रोत भरलेली दिसते. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची एक अत्यंत भव्य आणि व्यापक अशी कल्पना त्यांच्या मनामध्ये स्फुरण पावली अन् त्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी योग्य दिशेने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘माझ्या पहिल्याच भेटीत परम पूज्यांनी मला संतपद देऊ केले. त्यांनी माझ्यासारख्या लहान कलाकाराला पुढील कार्य करण्यासाठी प्रोत्साहित केले’, याबद्दल मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहीन. प्रत्येक भेटीत त्यांनी मला आणि माझ्या कार्याला योग्य अशी दिशा दाखवली. त्यांच्या शुभहस्ते ‘काव्यात्म भगवद्गीता’ या माझ्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. ‘त्यांनी या पुस्तकाबद्दल चार शब्द लिहून मला शुभाशीर्वाद दिले’, हे मी माझे महद्भाग्य समजतो.’

– पू. किरण फाटक (प्रसिद्ध शास्त्रीय गायक), डोंबिवली, जिल्हा ठाणे. (१९.४.२०२३)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.