राष्ट्राला सुखी आणि प्रगत करण्याचे व्रत घेतलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘परम पूज्य श्री डॉक्टर जयंत आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या वयाला ८१ वर्षे पूर्ण होत आहेत’, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. सर्वप्रथम ‘मी त्यांना दीर्घायुष्य आणि आरोग्यसंपन्न आयुष्य मिळो’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.       

शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून माझा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी संबंध आला. त्या माध्यमातून घडलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणदर्शन या लेखात व्यक्त केले आहे.

पू. किरण फाटक

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी भारतभर फिरून लोकांना साधनेचे महत्त्व पटवून देणे

प.पू. डॉ. आठवले यांनी वर्ष १९८७ ते १९९५ या काळात अध्यात्मविषयक अभ्यासवर्ग घेतले, त्या वेळचे संग्रहित छायाचित्र

जगभरातून अनेक लोक परम पूज्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनानुसार साधना करून शारीरिक आणि मानसिक त्रासातून मुक्त झाले आहेत. ‘जेथे वैद्यकीय उपाय थकतात, तेथे आध्यात्मिक स्तरावरील उपाय चांगले काम करतात’, हे परम पूज्य श्री डॉक्टर जयंत आठवले यांनी जाणले आणि त्यानुसार त्यांनी भारतभर फिरून अनेक लोकांना आध्यात्मिक बैठक दिली अन् सेवाधर्माचे (साधनेचे) महत्त्व पटवून दिले.

२. रामनाथी आश्रमाला भेट दिल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दाखवलेल्या साधनामार्गावरून सहस्रो साधक वाटचाल करत आहेत’, हे लक्षात येणे

सनातन संस्थेमध्ये अनेक कौतुकास्पद आणि अलौकिक अशी कार्यमालिका सतत चालू असते. मी साधारण २ वर्षांपूर्वी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आलो होतो. मला ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी येथे आणले. माझ्यासह नृत्यातील एक अलौकिक व्यक्तीमत्त्व श्री. राजकुमार केतकर हेसुद्धा होते. आश्रमात प्रवेश करताच आम्हाला तेथील अनेक गुणवैशिष्ट्ये जाणवली. येथे प्रत्येक जण आपापल्या सेवेत व्यस्त होता आणि आपली सेवा अत्यंत प्रामाणिकपणे करत होता. कोणीही उगाचच गप्पा मारत नव्हते किंवा उगाचच वेळ वाया घालवत नव्हते. सर्वकाही शिस्तीत चालले होते. येथे असणार्‍या साधकांमध्ये परस्परांविषयी एक स्नेहभाव, प्रेम आणि आदर दिसून आला. येथे सर्व जण एकमेकांना मानाने वागवतात. अनेक कुटुंबे आपल्या घरादारांवर तुळशीपत्र ठेवून येथे येऊन राहिली आहेत. ती सेवाधर्म आचरत आहेत. सेवाधर्मातूनच अध्यात्माकडे जाण्याचा मार्ग परम पूज्य डॉ. आठवले यांनी दाखवला आहे. सेवाधर्म ही एक साधनाच आहे. या मार्गावरून त्यांचे सहस्रो शिष्य (साधक) वाटचाल करत आहेत. हे सर्व पाहून आम्हाला अत्यंत आनंद झाला.

गोव्यातील सनातन संस्थेच्या आश्रमात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आढळतो. येथे अत्यंत पद्धतशीरपणे विविध सेवांची विभागणी केलेली आढळून येते. त्यामुळे सर्वच सेवा अल्प वेळेत आणि उच्च प्रतीच्या होतात. येथे पाहुण्यांचे आदरातिथ्य अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने केले जाते.

३. संशोधक वृत्तीचे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘माणसाला आनंद कसा प्राप्त होईल ?’, हा दृष्टीकोन ठेवून परम पूज्य वेगवेगळे संशोधनात्मक प्रयोग करण्यामध्ये व्यस्त असतात. ‘एक प्रयोगशील मानसशास्त्रज्ञ’ म्हणून जगामध्ये त्यांची ख्याती होती. ‘संमोहनशास्त्रज्ञ’ म्हणूनही त्यांनी जगामध्ये मोठे नाव कमावले होते. ‘संमोहनातून आरोग्यप्राप्ती कशी होईल ?’, याचा ते सतत विचार करत असत आणि प्रयोग करत असत. ते एक चांगले लेखक असून त्यांची शेकडो पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्याच्या लाखो प्रती जगभरात वितरित झाल्या आहेत.

४. तेथील प्रत्येक जण कितीही मोठा प्रतिभावंत असला, तरी विनम्र आहे. त्यामुळे मला प्रत्येकाशी मोकळेपणाने बोलता आले.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

माझी परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाली. त्या वेळी मला त्यांची पुढील गुणवैशिष्ट्ये लक्षात आली.

अ. त्यांचे व्यक्तीमत्त्व अतिशय भारदस्त असून ते आपल्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीवर लगेचच प्रभाव पाडतात.

आ. त्यांनी आपल्या निर्मळ आणि प्रेमळ स्वभावाने देश-विदेशातील अनेक क्षेत्रांतील प्रतिभावंत व्यक्तींना सनातन संस्थेशी जोडून ठेवले आहे.

इ. कोणी काही चांगले केले, तर ते त्याचे तोंड भरून कौतुक करतात आणि त्याला प्रोत्साहित करतात.

ई. त्यांचे बोलणे पूर्णपणे सकारात्मक असून ते दुसर्‍या व्यक्तीलाही सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त करत असतात.

उ. त्यांचे विचार अत्यंत पारदर्शी आणि स्वच्छ असून ते योग्य शब्दांतून त्यांची मांडणी करतात.

ऊ. सनातन संस्थेतील प्रत्येक सेवाव्रतीला (साधकाला) त्यांच्याविषयी अत्यंत आदर असून परम पूज्यसुद्धा सनातन संस्थेच्या प्रत्येक सदस्याची (साधकाची) योग्य ती काळजी घेतात.

ऐ. त्यांनी राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ हे वृत्तपत्र चालू केले. आज पूर्ण भारतात त्याचे सहस्रो वाचक आहेत.

ओ. आज परम पूज्य डॉ. जयंत आठवले यांचे सहस्रो साधक सेवाधर्मातून साधना करून ईश्वराची उपासना करत आहेत. राष्ट्राला सुखी आणि प्रगत करण्याचे व्रत या सर्व सेवाव्रतींनी उचलले आहे. त्या सर्वांना परम पूज्य डॉ. जयंत आठवले वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात.

६. कित्येक वर्षापासून अक्कलकोट निवासी ‘श्री स्वामी समर्थ’ हे माझे आराध्य दैवत आहे. ‘परम पूज्य डॉ. जयंत आठवले यांच्या रूपामधून श्री स्वामी समर्थ सगुण रूपात माझ्या समोर आले असावेत’, असे मला वाटते.

पुन्हा एकदा ‘परम पूज्य डॉ. जयंत आठवले यांना दीर्घायुष्य आणि आरोग्यदायी आयुष्य मिळो’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे चार शब्द संपवतो.’

– पू. किरण फाटक (प्रसिद्ध शास्त्रीय गायक), डोंबिवली, जिल्हा ठाणे. (१९.४.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक