जमियतचे नेते मौलाना मदनी यांचा ‘अल्ला आणि ॐ एकच’ असल्याचा दावा !

मदनी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सर्व धर्मीय संत मंचावरून स्वतःहून पायउतार !

नवी देहली – येथील रामलीला मैदानावर १० ते १२ फेब्रुवारी या कालावधीत जमियत उलेमा-ए-हिंदचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यानुषंगाने १२ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेल्या ‘सद्भावना संमेलना’त सर्व धर्मांच्या संतांना आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी जमियतचे नेते मौलाना (इस्लामचे अभ्यासक) अर्शद मदनी यांनी सरसंघचालकांच्या विधानाला विरोध करतांना ‘अल्लाह आणि ॐ एकच आहे’, असे विधान केले. यास मंचावर उपस्थित जैन गुरु लोकेश मुनी यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांच्यासह अन्य धर्मीय संतांनी मंच सोडला. प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी नुकतेच ‘हिंदु आणि मुसलमान यांचे पूर्वज एकच आहे’, असे विधान केले होते. या विधानाला मदनी यांनी विरोध केला.

काय म्हणाले मौलना मदनी ?

मौलाना अर्शद मदनी हे जमियतचे प्रमुख महमूद मदनी यांचे काका आहेत. मौलाना मदनी म्हणाले की, तुमचे पूर्वज हिंदू नव्हते. ते मनु म्हणजे आदम होते. तेव्हा कुणीही नव्हते. ना श्रीराम, ना ब्रह्मा, ना शिव. तेव्हा कुणीही नसतांना मनुने कुणाची पूजा केली ? असा माझा प्रश्‍न आहे. कुणी ‘ते महादेवाची पूजा करत होते’, असे सांगतात, तर काही जण मनुने ॐची पूजा केल्याचा दावा करतात. ॐ कोण आहे ? अनेकांनी सांगितले की, ती हवा आहे. त्याला कोणतेही रूप किंवा रंग नाही. ते जगात सर्वत्र आहेत. यालाच आम्ही अल्ला म्हणतो. तुम्ही त्याला देव म्हणता.

जैन मुनी लोकेश यांनी केला विरोध !

मौलाना मदनी यांचे भाषण चालू असतांनाच जैन मुनी लोकेश यांनी त्यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला. ‘हे अधिवेशन माणसे जोडण्यासाठी आयोजित केले आहे. त्यामुळे अशा विधानाचे कोणतेही औचित्य नाही’, असे सांगत ते मंचावरून पायउतार झाले. त्याच वेळी अन्य धर्मांच्या संतांनीही मंच सोडला.

मदनी पुढे म्हणाले की, पैगंबरांचा अपमान मुसलमान सहन करणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात कुणीही वक्तव्य करू नये. भारतात सध्या शिक्षणाचे भगवेकरण होत आहे. हे योग्य नाही. कुणावरही दुसर्‍या धर्मांची पुस्तके लादू नयेत. हे राज्यघटनेच्या विरोधात आहे.

सुफी इस्लामिक बोर्डाकडून जमियतचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांना विरोध !

भारताचा मूळ धर्म सनातन आहे !

जमियत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख महमूद मदनी यांनी या अधिवेशनात आदल्या दिवशी म्हटले होते की, भारत हा इस्लामचा मूळ देश आहे. त्यावर सुफी इस्लामिक बोर्डाने आक्षेप घेतला. बोर्डाचे राष्ट्रीय प्रवक्ते कशिश वारसी यांनी म्हटले की, इस्लाम हा भारताचा मूळ धर्म नाही. येथील मूळ धर्म सनातन आहे. महमूद मदनी यांच्याविषयी सांगायचे, तर ते फतव्याचा कारखाना आहेत. इस्लाम पहिल्या येणार्‍या मुसलमानांनी आणला. हजरत मतलतुल औलिया, मकरबूर शरीफ आले. त्यानंतर अरबस्तानातील कासिम बिन मलिक भारतात केरळमध्ये आले. त्यानंतर पाकचे ख्वाजा गरीब नवाज आले. ज्यांनी येथे येऊन इस्लामचा प्रसार केला. त्यांच्या चारित्र्यामुळे आणि चांगल्या वागणुकीमुळे येथे इस्लामचा प्रसार झाला. आज देशातील सरकार कोणत्याही मुसलमानाला ‘बाहेरचा माणूस’ मानत नाही.