राज्यशासन लव्ह जिहादविरोधी कायदा करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन !

डावीकडून दुसरे श्रीकांत पिसोळकर (भगवा सदरा), श्यामसुंदर सोनी, सुनील घनवट, निवेदन स्वीकारतांना एकनाथ शिंदे, आमदार भरतशेठ गोगावले, माजी मंत्री डॉ. परिणय फुके, आनंद घारे

नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – ‘लव्ह जिहाद’ केवळ प्रेमप्रकरण आहे, असे प्रारंभी वाटत होते; परंतु हे एक षड्यंत्र असल्याचे आमच्याही लक्षात आले आहे. लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांविषयी राज्यशासन गंभीर आहे. राज्यशासन लव्ह जिहादविरोधी कायदा करणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.

हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २१ डिसेंबर या दिवशी विधानभवनावर मोर्चा काढला. या मोर्च्यानंतर समितीच्या शिष्टमंडळाने विधीमंडळात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करण्याची मागणी केली. याविषयीची निवेदने त्यांना देण्यात आली.

शिष्टमंडळामध्ये बाळसाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद (पक्षशिस्तीच्या पालनाचे दायित्व असणारा) आमदार श्री. भरतशेठ गोगावले, आमदार श्री. महेंद्र थोरवे, आमदार श्री. महेंद्र दळवी, माजी मंत्री आणि भाजपचे नेते डॉ. परिणय फुके, शिवसेनेचे माजी खासदार श्री. आनंदराव अडसूळ, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव श्री. आनंद घारे, हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर, अखिल भारतवर्षीय माहेश्‍वरी महासभेचे नागपूर येथील सभापती श्री. श्यामसुंदर सोनी उपस्थित होते. श्री. सुनील घनवट यांनी मुख्यमंत्र्यांना लव्ह जिहादविषयी सविस्तर माहिती दिली.