पूर्वजांचा शौर्याचा इतिहास न शिकवता ‘जगज्जेते’ नसणार्‍यांचा इतिहास आपल्यावर लादला गेला ! – डॉ. पांडुरंग बलकवडे, इतिहासतज्ञ

छत्रपती शिवरायांच्या ३४५ व्या पुण्यतिथीच्या निमित्त पुणे येथील कार्यक्रम !

संग्रहित छायाचित्र

पुणे, १५ एप्रिल (वार्ता.) – ज्या भारतीय संस्कृतीला परकीयांनी रानटी म्हणून हिणवले, त्या परकीय रानटी समाजाला भारतीय संस्कृतीने माणूस बनवले. आपल्या पूर्वजांचा शौर्याचा इतिहास पाठ्यपुस्तकांमधून न शिकवता जे ‘जगज्जेते’ नाहीत, त्यांचा इतिहास आपल्यावर लादला गेला. त्यातून भारतियांच्या मनात स्वसंस्कृतीविषयी नैराश्य निर्माण व्हावे, हा उद्देश होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहासतज्ञ डॉ. पांडुरंग बलकवडे यांनी केले. ते भारतीय इतिहास संशोधक मंडळ, पुणे यांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या ३४५ व्या पुण्यतिथीच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या वेळी ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’चे अध्यक्ष श्री. प्रदीप रावत आणि अन्य उपस्थित होते.

डॉ. पांडुरंग बलकवडे, इतिहासतज्ञ

डॉ. बलकवडे म्हणाले की, भारतातील समृद्धतेच्या आकर्षणातून आपल्या देशावर परकियांची अनेक आक्रमणे झाली. या आक्रमकांनी लूट करून आपला देश उद्ध्वस्त केला होता. अशा उद्ध्वस्त भारताची संस्कृती, समाज आणि राष्ट्राचे रक्षण करण्याचे महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले.

एका अर्थाने छत्रपती शिवराय हेच भारतीय संस्कृतीचे जीर्णोद्धारक आहेत. शिवरायांनी कृषी क्रांती, सामाजिक क्रांती, अर्थ क्रांती, गनिमी काव्याची युद्ध क्रांती, आरमार क्रांती, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग निर्मितीची क्रांती, भाषा-शुद्धी क्रांती आणि संस्कृतीच्या रक्षणाची सांस्कृतिक क्रांती करून एकप्रकारे भारतीय संस्कृतीचा जीर्णोद्धारच केला आहे.

नेताजी पालकर यांचे शुद्धीकरण करून त्यांना स्वधर्मात घेतले आणि समाजात त्यांना मानाचे स्थान मिळवून दिले. शिवरायांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादातून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी औरंगजेबाशी यशस्वी संघर्ष करत आपल्या स्वराज्याचे रक्षण केले. याच राष्ट्रवादातून १८ व्या शतकात अटक ते कटकपर्यंत मराठा साम्राज्य निर्माण झाले. मराठ्यांनी केवळ साम्राज्यच निर्माण केले नाही, तर प्रसंगी बलीदान देऊन राष्ट्राचेही रक्षण केले.