पंढरपूरचे तीर्थक्षेत्राचे स्वरूप जपण्यासाठी सरकारने पावले उचलावीत ! – कॉरिडॉर हटाव कृती समिती

कॉरिडॉरच्या विरोधात स्वाक्षर्‍यांची मोहीम

(कॉरिडॉर म्हणजे सुसज्ज आणि प्रशस्त मार्ग)

पंढरपूर विठ्ठल मंदिर

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – पंढरपूर येथे नियुक्त होणारे प्रशासकीय अधिकारी त्यांच्या मनाप्रमाणे मंदिरासंबंधी पालट करतात. हा प्रकार बंद करून पंढरपूरचे तीर्थक्षेत्राचे स्वरूप कायम रहावे, यासाठी शासनाने पावले उचलायला हवीत. पंढरपूरचा अनियोजित विकास म्हणजे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय आहे. यामुळे पंढरपूर कॉरिडॉरला विरोध असल्याचे सांगत बाधित जागामालक आणि भाडेकरू यांनी १२ एप्रिल या दिवशी स्वाक्षरी मोहीम चालू केली आहे.

संत नामदेव पायरी आणि संत चोखामेळाच्या समाधीला वंदन करून स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी बोलतांना ‘कॉरिडॉर हटाव कृती समिती’चे निमंत्रक अभयसिंह इचगावकर म्हणाले की, पंढरपूर कॉरिडॉरच्या रूपाने एक संकट आले आहे, यामुळे पंढरपूर भकास होणार आहे. त्यामुळे कॉरिडॉरला आमचा विरोध रहाणार आहे. या पूर्वी राज्यशासनाकडून आलेल्या निधीचा वापर भाविक आणि नागरिक यांसाठी योग्य प्रकारे झालेला नाही. शासनाने बांधलेल्या अनेक इमारती वापराविना पडून आहेत.

या वेळी कॉरिडॉरच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमास कृती समितीचे विवेक बेणारे, कौस्तुभ गुंडेवार, कौलगी, नगरकर, मंदार कुलकर्णी आदींसह नागरिक, बाधित मोठ्या संख्येने उपस्थित होते.