कोल्हापूर, १५ एप्रिल – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील गरुड मंडपाच्या लाकडी खांब उभारणीच्या कामाचा प्रारंभ ‘द्वार प्रतिष्ठापना’ आणि ‘पूर्णाहुती होम विधी’ने करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रशासक अमोल येडगे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, पुरोहित विकास जोशी, पंकज दादर्णे, प्रमोद उपाध्ये उपस्थित होते. मंडपासाठी लागणारे ५२ खांब सिद्ध असून प्रत्यक्ष खांब उभारणीच्या कामास प्रारंभ करण्यात आला. या कामासाठी देवस्थानच्या स्वनिधीतून १२ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे.
या मंडपाचे पूर्वीचे लाकडी खांब खचल्याने आणि त्यांना वाळवी लागल्याने मूळ गरुड मंडपास धोका निर्माण झाला होता. त्यासाठी नवीन सागवानी लाकूड आणून टेंभलाईदेवी मंदिर परिसरात या लाकडापासून ५२ खांब सिद्ध करण्यात आले. नव्या बांधकामात दगडी मुरुमाचा वापर करून गरुड मंडपाचा पाया मजबूत करण्यात आला आहे. हे खांब खचू नयेत, तसेच हवामान यांचा परिणाम होऊ नये; म्हणून त्यावर विशेष प्रक्रिया करण्यात आली आहे. या संदर्भात शिवराज नाईकवाडे म्हणाले, ‘‘गरुड मंडपाच्या खांब उभारणीचे काम पावसाळ्याच्या पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार काम करणार्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.’’

गरुड मंडपाचे वैशिष्ट्य
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात देवीच्या मूर्तीसमोर असलेल्या गरुड मंडपाची उभारणी ही वर्ष १८४४ ते १८६७ या कालावधी झाल्याचे सांगितले जाते. श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांकडून होणारा अभिषेक, विविध धार्मिक विधी, गणेशोत्सव, श्री महालक्ष्मीदेवीचे विविध सोहळे हे याच मंडपात होतात. त्यामुळे या मंडपाला विशेष महत्त्व आहे.