अपात्र शिधापत्रिका मोहीम का चालू करावी लागली ? याच्या मुळाशीही जाणे आवश्यक आहे !

पुणे – खडकवासला विधानसभा मतदारसंघात पुरवठा विभागाच्या वतीने अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम चालू केली आहे. या मोहिमेमध्ये शिधापत्रिका धारकांची पडताळणी होत असून खोटी माहिती देणार्या कार्डांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. रेशन दुकानदारांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या आहेत. धान्यवाटप करतांना लाभार्थी कार्डधारकांचे अर्ज भरले जाणार आहेत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यास त्यांचे धान्यवाटप बंद करून शिधापत्रिका रहित केली जाणार आहे.
‘रेशनिंग’चे अन्नधान्य घेणार्या कार्डधारकांनी वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाची खोटी माहिती दिल्यास पोलीस कारवाई करतील, असे खडकवासला विधानसभा अन्नधान्य पुरवठा विभागाच्या निरीक्षक डॉ. पल्लवी सपकाळे यांनी सांगितले.
शासकीय सेवेत, तसेच घरात शासकीय निवृत्तीवेतनधारक असतांना, एकत्रित कुटुंबाचे उत्पन्न अधिक असतांना अनेक जण शासनाच्या विनामूल्य धान्य योजनेचा अपलाभ घेत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सिंहगड खडकवासला पश्चिम हवेलीतील कार्डधारकांची संख्या निम्म्याहून अल्प होईल, असा अंदाज आहे.