भारताच्या स्वीकारार्हतेच्या संस्कृतीमुळेच अहिंदूंना ‘हिंदु’ ओळख मिळाली !

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

दरभंगा (बिहार) – भारतात रहात असलेले सर्व नागरिक मूलत: हिंदू आहेत. भारतात वास्तव्य करत असल्यानेही ते हिंदूच आहेत. त्यांची (अहिंदूंची) आजची ओळख काहीही असली, तरी भारताच्या स्वीकारार्हतेच्या संस्कृतीमुळेच ती त्यांना मिळाली आहे, हे त्यांनी ध्यानात घ्यावे. शतकानुशतकांपूर्वीच्या संस्कृतीचे नावच हिंदुत्व आहे, असे प्रतिपादन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे संघ स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना केले.

प.पू. भागवत यांनी ४ दिवसांच्या बिहार दौर्‍याची सांगता करण्यापूर्वी झालेल्या या कार्यक्रमात पुढे म्हटले की,

१. भारतमातेची स्तुती करण्यासाठी संस्कृत श्‍लोकाचे पठण करणे मान्य असणारा आणि या भूमीच्या संस्कृतीचे रक्षण करण्यास कटीबद्ध रहाणारा प्रत्येक जण हिंदू आहे.

२. हिंदु संस्कृती ही मुळातच सामावून घेणारी आहे. त्यामुळे आज वेगवेगळी ओळख सांगणारी आणि एकमेकांच्या विरोधात उभी ठाकलेली मंडळी दिसत असली, तरी प्रत्येकाने आपल्या आरंभीपर्यंत मागे डोकावल्यास एकच मूळ दिसून येईल.

३. स्वतःला इतरांमध्ये पहाणे, स्त्रियांकडे उपभोगाची वस्तू म्हणून नव्हे, तर माता म्हणून पहाणे आणि इतरांच्या मालकीच्या संपत्तीची लालसा न करणे, ही मूल्ये हिंदु धर्माची व्याख्या स्पष्ट करतात.