नागपूर येथे आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने ‘सी.पी.आर्. प्रशिक्षण’ पार पडले !

‘सी.पी.आर्. म्हणजे हृदय-श्वसन पुनरुज्जीवन तंत्र !’

नागपूर – हिंदु जनजागृती समिती अंतर्गत आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने ‘सी.पी.आर्. प्रशिक्षण’ शिबीर येथील राजराजेश्वरी मंदिर, कोतवालनगर येथे पार पडले.  सी.पी.आर्. तंत्र म्हणजे गंभीर स्थितीतील रुग्णासाठी वैद्यकीय साहाय्य मिळेपर्यंतची संजीवनी होय ! या तंत्राने अनेकांचे प्राण वाचवता येऊ शकतात. असे हे तंत्र शिकवण्यासाठी अखिल भारतीय भूलतज्ञ संघटनेच्या वतीने डॉ. शीतल दलाल, भूलतज्ञ डॉ. रश्मी शिंगाडे आणि भूलतज्ञ डॉ. तपस्या धवने यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिराच्या प्रारंभी समितीच्या वतीने भूलतज्ञ डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. या शिबिराचा लाभ अनेकांनी घेतला.

डावीकडून प्रात्यक्षिक दाखवतांना डॉ. तपस्या धवने आणि उजवीकडे डॉ. रश्मी शिंगाडे

या प्रशिक्षणाच्या वेळी प्रत्यक्ष करायच्या कृती ‘डमी’वर (बाहुल्याच्या स्वरूपातील निर्जीव मनुष्य) करून दाखवण्यात आल्या. शिबिरात आरोग्य साहाय्य समितीचे विदर्भ समन्वयक डॉ. थोटे उपस्थित होते. समारोपप्रसंगी समितीच्या सौ. स्मिता दाणी यांनी प्रथमोपचार वर्गात अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

क्षणचित्रे

१. ‘शिबिरामध्ये प्रात्यक्षिक शिकायला मिळाल्याने आत्मविश्वास वाढला’, असे उपस्थित प्रशिक्षणार्थींनी सांगितले.
२. ‘ऑनलाईन वर्गापेक्षा प्रत्यक्ष विषय शिकल्याने आकलन होते, तसेच त्याची गंभीरता कळते’, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
३. प्रशिक्षक म्हणून आलेल्या डॉक्टरांनी ‘आरोग्य साहाय्य समितीचा हा उपक्रम जाणून घेऊन समिती चांगले प्रयत्न करत आहे’, असे गौरवोद्गार काढले. तसेच त्यांनी भविष्यातही अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी सिद्धता दर्शवली.