प.पू. डॉ. मोहन भागवत यांच्‍याविषयी खोटे वृत्त दिल्‍याप्रकरणी दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक आणि मालक यांना अटक करावी !

भाजपचे प्रवक्‍ते शिवराय कुळकर्णी यांची पोलीस आयुक्‍तांकडे मागणी  

प.पू. डॉ. मोहन भागवत

अमरावती – राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. डॉ. मोहन भागवत यांनी केलेल्‍या भाषणानंतर दैनिक ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राने जातीजातींत तेढ निर्माण करणारे वृत्त प्रकाशित केले आहे. हे वृत्त खोटे, अपसमज पसरवणारे, जातीय सद़्‍भाव बिघडवणारे आणि काही समाजघटकांचा अवमान करणारे आहे. त्‍यामुळे लोकसत्ताचे संपादक आणि मालक यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करून त्‍यांना अटक करावी, अशी मागणी येथील भाजपचे प्रवक्‍ते शिवराय कुळकर्णी यांनी १० ऑक्‍टोबर या दिवशी येथील पोलीस आयुक्‍त डॉ. आरती सिंह यांना दिलेल्‍या निवेदनात केली आहे.

या निवेदनात शिवराय कुळकर्णी यांनी म्‍हटले आहे की,

१. काही दिवसांपूर्वी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. डॉ. मोहन भागवत यांनी नागपूर येथे झालेल्‍या एका कार्यक्रमात शास्‍त्र आणि रिवाज यांचा संदर्भ देत भारतात जातीभेद नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले होते.

२. संघविरोधकांनीही चिंतन करावे, असे ते भाषण होते. राज्‍यघटनेने अंगीकारलेल्‍या जातीरहित समाजाचा स्‍वीकार हेच भारताचे भविष्‍य असावे, हे त्‍यांनी ठासून सांगितले.

३. त्‍यांच्‍या या वक्‍तव्‍याचे समाजातून स्‍वागत झाले. हे होणे आवश्‍यक होते; मात्र दैनिक ‘लोकसत्ता’मध्‍ये प.पू. डॉ. भागवत यांच्‍या सुधारणावादाविषयी अपसमज होणारे वृत्त प्रकाशित केले.

४. ज्‍या शब्‍दांचा प.पू. डॉ. मोहन भागवत यांनी उल्लेख केला नाही, ते त्‍यांच्‍या तोंडी घालून एका समाजाला दुखावले, अवमानित केले आणि इतर समाजाच्‍या रोषास कारण निर्माण केले.

५. सामाजिक सद़्‍भाव बिघडवला. लोकसत्ताने असे वृत्त जाणीवपूर्वक प्रकाशित केले, असे माझे ठाम मत आहे. डॉ. भागवत यांनी आपल्‍या भाषणात एकदाही न उच्‍चारलेला ‘ब्राह्मण’ हा शब्‍द त्‍यांच्‍या तोंडी घालून विधायकतेला काळीमा फासण्‍याचा प्रयत्न केला.

६. लोकसत्ताकारांनी एका ठराविक जातीचा अवमान करून इतर जातींना चिथावणी दिली आहे. हेतुपुरस्‍सर जातीभेद केला आहे.