आम्हाला परत फाळणीच्या रस्त्याने जायचे नाही ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूर येथील दसरोत्सव !

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत(सौजन्य :ANI)

नागपूर – ‘आम्ही वेगळे दिसतो, आम्ही एक-दुसर्‍याचे नाही. आम्हाला आमचे वेगळे पाहिजे’, हा चुकीचा विचार आहे. या चुकीच्या विचारांचा दु:खदायक परिणाम आम्ही पाहिला आहे. अशा विचारांमुळे भाऊ दुरावला, भूमी वाटली गेली, तसेच धर्म आणि संस्था मिटल्या. आम्हाला परत त्या (फाळणीच्या) रस्त्याने जायचे नाही. आम्हाला एकत्र रहायचे आहे, असे प्रतिपादन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले. ५ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात ते बोलत होते.

या वेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ‘परमवैभवी भारत होगा’ हे सांघिक गीत, शारीरिक कवायती आणि प्रात्यक्षिके यांच्यानंतर कार्यक्रमाला प्रारंभ झाला.

प.पू. डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की,

१. आम्हाला एकत्र रहायचे असेल, तर आधी भारताचे व्हावे लागेल. आम्ही भारतीय पूर्वज आणि भारतीय संस्कृती यांचे वंशज आहोत. समाज आणि राष्ट्रीयता यांच्या संबंधाने आम्ही एक आहोत. हाच आमच्यासाठी तारक मंत्र आहे.

२. भारताला स्वातंत्र्य मिळाले; पण त्यानंतर पाकिस्तानची निर्मिती झाली. यामुळे हिंदु-मुसलमान यांच्यात शाश्‍वत राजकीय दरी निर्माण झाली. हे चुकीचे झाले.

३. आम्ही हिंदूसंघटन करतो; पण आम्ही कुणाचा विरोध करत नाही. लोक ‘भारतीय’, ‘इंडिक’ असा शब्दप्रयोग करतात; पण आम्ही आमच्या स्पष्टतेसाठी हिंदु शब्दाचा उपयोग करू. साधन, शुचिता आणि तपस्या यांच्या आधारावर संघाचे संघटन निर्माण झाले आहे. त्यामुळे संघशक्ती कधीच उपद्रवी होऊ शकत नाही.

४. लोकसंख्येत प्रमाणाचे संतुलन पाहिजे. लोकसंख्येचे धोरण सर्वांना समान लागू झाले पाहिजे. ५० वर्षांनंतर आम्ही किती लोकांना जेवू घालू शकतो आणि त्यांचे दायित्व घेऊ शकतो, याचा समग्र विचार करून धोरण सिद्ध करावे लागते.

५. आम्ही मुलांना इंग्रजी शाळेत शिकवतो. घरावरील नावाची पाटी, तसेच मंगल कार्यालयाच्या निमंत्रण पत्रिकाही इंग्रजीतून पाठवतो. ‘करिअर’साठी इंग्रजी आवश्यक आहे’, अशी ठाम समजूत आहे; पण तसे नाही. आपण मातृभाषेच्या गोष्टी करतो; पण जोपर्यंत स्वत:पासून कोणत्याही गोष्टीस प्रारंभ करत नाही, तोपर्यंत काहीही साध्य होत नाही. शैक्षणिक धोरणांत मातृभाषेतून शिक्षण देण्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्याचा अभ्यासक्रमही सिद्ध होत आहे; पण समाजाचे सहकार्य मिळत नाही, तोपर्यंत कोणतीही गोष्ट यशस्वी होत नाही.

६. अन्याय, असत्य, अत्याचार आणि आतंकवाद यांच्या विरोधात समाजाने एकजुटीने उभे राहिले पाहिजे.