मुंबई – राज्यातील शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यास प्रारंभ झाला आहे. या ‘डिजिटल गव्हर्नन्स’ आणि ‘राईट टू सर्व्हिस’मध्ये महाराष्ट्राला देशात आदर्श करण्यासाठी ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘गेट्स फाऊंडेशन’कडून सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही ‘मायक्रोसॉफ्ट’चे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी दिली. याच समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महिला स्वयंरोजगाराच्या २५ लाख लखपती दीदींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी या उपक्रमात सहभाग घेऊन महिलांना उद्योजक बनवण्यात ‘गेट्स फाऊंडेशन’ने भागीदारी घेण्याची सिद्धता दर्शवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘मायक्रोसॉफ्ट’चे सहसंस्थापक, प्रख्यात उद्योजक आणि गेट्स फाऊंडेशनचे बिल गेट्स यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.
‘मायक्रोसॉफ्ट’चे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. या वेळी गेट्स आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापराविषयी सकारात्मक चर्चा झाली.
या संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘बिल गेट्स यांची पहिल्यांदाच भेट होत असून याचा आनंद आहे. महाराष्ट्र परिवर्तन टप्प्यातून जात असल्याने पायाभूत सुविधा, कृषी, आरोग्यामध्ये मोठे प्रकल्प चालू आहेत. ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता असल्याने दर्जेदार आरोग्य सेवा-सुविधा देण्यासाठी ‘गेट्स फाऊंडेशन’ने सहकार्य करावे. कृत्रिम बुद्धीमत्तेचा (‘ए.आय.’चा) वापर आरोग्य आणि कृषी क्षेत्रामध्ये करण्यासाठी अर्थसंकल्पातही प्रावधान केले आहे. पुणे जिल्ह्यात ‘एआय’च्या वापरातून उसाचे दुप्पट उत्पादन घेतल्याचे उदाहरणही आपल्यासमोर आहे.’’