शिवराज सिंह चौहान यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत ठेवली श्री महाकालेश्‍वराची प्रतिमा

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत ठेवलेली श्री महाकालेश्‍वराची प्रतिमा

उज्जैन – मध्यप्रदेशातील उज्जैन येथे प्रथमच राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री मुख्य खुर्चीत बसतात; मात्र या बैठकीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत श्री महाकालेश्‍वराची प्रतिमा ठेवली. ‘आजची बैठक श्री महाकाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. हा उज्जैनचा राजा आहे. आम्ही सर्व त्याचे सेवक आहोत’, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.

बैठकीपूर्वी मंत्र्यांना संबोधित करतांना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, ‘‘महाकाल कॉरिडॉर’ आता ‘श्री महाकाल लोक’ म्हणून ओळखला जाईल. श्री महाकाल महाराज सरकार आहे, राजा आहे; म्हणूनच आज श्री महाकाल महाराजांच्या भूमीवर आम्ही सर्व सेवक बैठक घेत आहोत. आपल्या सर्वांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. श्री महाकाल महाराजांनी राज्यातील सर्व जनतेवर आशीर्वादाचा वर्षाव करावा, हीच प्रार्थना.’’

या बैठकीत श्री महाकालेश्‍वर मंदिराच्या विस्ताराविषयी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.