बीजामृत बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

‘२५० मिलि (साधारण २ वाट्या) पाणी, पाव वाटी देशी गायीचे ताजे शेण, २५ मिलि (साधारण पाव वाटी) गोमूत्र (हे कितीही जुने चालते), १ चिमूट खायचा चुना (हा पानपट्टीच्या दुकानात मिळतो), १ चिमूट माती’ हे सर्व एका प्लास्टिकच्या डब्यात एकत्र करून २ मिनिटे ढवळावे आणि सुती कपड्याने झाकून सावलीत ठेवून द्यावे. २४ घंट्यांमध्ये हे सिद्ध होते. सिद्ध झाल्यानंतर पुढच्या २४ घंट्यांत पुढीलप्रमाणे वापरावे.

सौ. राघवी कोनेकर

ज्या बिया पेरायच्या आहेत, त्यांच्यावर स्वतःच्या हाताने थोडेसे बीजामृत घालून बियाणे साधारण १ मिनिट हलकेच चोळावे. सर्व बियाण्याला बीजामृत लागण्यापुरतेच बीजामृत घ्यावे. जास्त घेण्याची आवश्यकता नसते. बिजामृत लावल्यावर बिया काही वेळ सावलीत सुकू द्याव्यात आणि मग पेराव्यात.

वांगी, टोमॅटो, मिरची यांच्या लागवडीसाठी बियाण्यांपासून लहान रोपे बनवावी लागतात. ही रोपे लावण्यापूर्वीसुद्धा त्यांची मुळे १ मिनिट बिजामृतात बुडवून ठेवावीत. याच पद्धतीने आले, हळद इत्यादी कंदांची लागवड करण्यापूर्वी ते कंद १ मिनिट बिजामृतात बुडवून मग लावावेत. रोपे आणि कंद बिजामृतात बुडवल्यावर लागलेले बीजामृत वाळण्याची वाट न पहाता थेट लागवड करावी.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, फोंडा, गोवा. (१२.८.२०२२)