‘क्रियापदे’ आणि ‘धातू’

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

‘संस्कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या संस्कृतोद्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असण्ो अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

मागील लेखात आपण ‘विशेषणां’ची माहिती घेतली. आजच्या लेखात ‘क्रियापदे’ आणि ‘धातू’ यांच्याविषयी जाणून घेऊ.

(लेखांक १२ – भाग १)

१. ‘क्रियापद’ म्हणजे काय ?

‘त्याने चित्र रंगवले’, या वाक्यातील ‘रंगवले’ हा शब्द रंगवण्याची क्रिया दर्शवतो. त्याखेरीज ‘रंगवले’ या शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. अशा प्रकारे ‘वाक्याचा अर्थ पूर्ण करणार्‍या क्रियावाचक (क्रिया दर्शवणार्‍या) शब्दाला ‘क्रियापद’ असे म्हणतात. वरील वाक्यात ‘रंगवले’ हे क्रियापद आहे. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत आणि त्यांच्यापुढे कंसात त्यांतील क्रियापदे दिली आहेत.

अ. नरवीर तानाजी मालुसरे मोठ्या शौर्याने लढले. (लढले)
आ. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक आणि कान कापले. (कापले)
इ. वाटसरू दमून एका मोठ्या झाडाखाली बसला. (बसला)
ई. आजी भाग्यश्रीला ओरडली. (ओरडली)

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

२. वाक्यात क्रिया दाखवणारे दोन शब्द असले, तरी क्रियापद मात्र एकच असणे

काही वेळा वाक्यात क्रिया दाखवणारे दोन शब्द असतात. ‘तुम्ही तुमचे साहित्य आणून ठेवा’, या वाक्यात ‘आणण्याची’ आणि ‘ठेवण्याची’ अशा दोन क्रिया आलेल्या आहेत; मात्र वाक्यातील ‘आणून’ या शब्दाद्वारे वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. त्याच्यापुढे ‘ठेवा’ हा शब्द लिहिला की, वाक्य पूर्ण होते. त्यामुळे या वाक्यात क्रिया दर्शवणारे दोन शब्द असले, तरी क्रियापद मात्र ‘ठेवा’ हे एकच आहे. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. तू तुझी खेळणी घेऊन जा.
आ. आम्ही जरा नदीवर जाऊन येतो.
इ. तो दमून झोपला.
ई. त्या देवीची ओटी भरून आल्या.

३. सर्वच क्रियापदे क्रिया दाखवणारी नसणे

‘क्रियापदे वाक्यातील क्रिया दाखवतात’, हे जरी योग्य असले, तरी सर्वच क्रियापदे क्रिया दाखवणारी नसतात. ‘ते संन्यासी आहेत’, या वाक्यामध्ये ‘आहेत’ हे क्रियापद आहे; परंतु ते कोणतीही क्रिया दाखवत नाही, तर वाक्यातील ‘ते’ या कर्त्याची स्थिती दाखवतात. ‘कर्ता’ म्हणजे ‘क्रिया करणारा.’ अशा प्रकारे ‘कर्त्याची स्थिती दाखवणार्‍या शब्दालाही ‘क्रियापद’ असेच म्हणतात.’ याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. भीम गदायुद्धात निपुण होता.
आ. सचिन माझा वर्गमित्र आहे.
इ. ती उत्तीर्ण झाली.
ई. एकलव्य वनात रहात असे.

४. ‘धातू’ म्हणजे काय ?

‘तो प्रतिदिन एक मैल चालतो’, या वाक्यात ‘चालतो’ हे क्रियापद आहे. या क्रियापदातील ‘चाल’ हा मूळ शब्द आहे. त्याला ‘तो’ हा प्रत्यय लागून ‘चालतो’ हे क्रियापद सिद्ध झाले आहे. यातील प्रत्यय नसलेल्या ‘चाल’ या मूळ शब्दाला ‘धातू’ असे म्हणतात. थोडक्यात, ‘क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द म्हणजे ‘धातू’ होय.’

धातूची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत –

जा, ये, खा, घे, खेळ, वाच, बोल, ठेव, बांध, उचल इत्यादी.

शब्दकोशांमध्ये धातूंची मूळ रूपे न देता त्यांना ‘णे’ हा प्रत्यय लावून ती देण्याची पद्धत आहे, उदा. जाणे, येणे, खाणे, घेणे इत्यादी; मात्र धातूंची ही रूपे म्हणजे क्रियापदे नव्हेत. या धातूंचे क्रियापदांत रूपांतर होण्यासाठी त्यांना ‘णे’ या प्रत्ययाच्या जागी ऊन, ते, तो, तात इत्यादी अन्य प्रत्यय लावावे लागतात.’

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.८.२०२२)