उर्दू शिकवण्यात येत नसलेल्या शाळांना रविवारचीच सुटी ! – झारखंड सरकारचा आदेश

मुख्यमंत्री हेमंत सोरेन

रांची (झारखंड) – झारखंड प्राथमिक शिक्षण विभागाने दिलेल्या नव्या आदेशामध्ये ‘उर्दू शाळा’ म्हणून घोषित करण्यात आलेली नाही, अशा शाळांनी शाळेच्या नावापुढे ‘उर्दू’ असा शब्द लिहिला आहे, त्यांनी तो शब्द हटवावा’, असे म्हटले आहे. तसेच अशा शाळांना रविवारची साप्ताहिक सुटी असणार आहे. सकाळची प्रार्थनाही नेहमीच्या पद्धतीने असणार आहे. ‘सर्व शाळांनी या आदेशाचे पालन करावे’, असेही यात म्हटले आहे. ज्या शाळांना सरकारने ‘उर्दू शाळा’ म्हणून घोषित केले आहे त्यांना शुक्रवारचीच सुटी असणार आहे का ?, हे समजू शकलेले नाही.

झारखंडच्या जामताडा जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये रविवारऐवजी शुक्रवार या दिवशी साप्ताहिक सुटी देण्यात येत असल्याचे समोर आले होते. शुक्रवारची सुटी देण्यासाठी दबाव निर्माण करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना काँग्रेसने पत्र लिहिले होते.

संपादकीय भूमिका

  • कोणतीही पूर्वानुमती न घेता शुक्रवारची सुटी देण्याची प्रथा कशी चालू झाली ?
  • शासकीय नियमांचा भंग करणार्‍या या शाळांवर सरकार काय कारवाई करणार आहे ?