फळ्यावर ‘जय श्रीराम’ लिहिणार्‍या विद्यार्थ्याला मुख्याध्यापक अबुल कलाम यांच्याकडून बेदम मारहाण !

मुख्याध्यापकावर कठोर कारवाई करण्याचे आश्‍वासन !

रांची (झारखंड) – राज्यातील गिरिडीह जिल्ह्यात असलेल्या पाल्मो गावातील सरकारी शाळेत इयत्ता चौथीत शिकणार्‍या एका विद्यार्थ्याला वर्गाच्या फलकावर ‘जय श्रीराम’ लिहिल्यासाठी बेदम मारहाण करण्यात आली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ‘अपग्रेडेड गव्हर्नमेंट मिडल स्कूल, पाल्मो’चे मुख्याध्यापक महंमद अबुल कलाम यांनी ९ जुलै या दिवशी या विद्यार्थ्याला मारहाण केली. नंतर पुन्हा आक्रमण होईल, या भीतीने मुलाने त्याच्या पालकांना घडलेल्या घटनेविषयी सांगतिले नाही; परंतु पालकांनी वारंवार विचारणा केल्यानंतर त्याने घडलेली घटना सांगितली.

त्यानंतर १३ जुलै या दिवशी ग्रामस्थांनी शाळेत पंचायत सदस्यांच्या उपस्थितीत एक बैठक बोलावली. बैठकीच्या वेळी अनेक पालकांनी महंमद अबुल कलाम यांच्यावर मुलांना शाळेतील स्वच्छतागृहे साफ करण्यास भाग पाडल्याचा आरोपही केला. गावकरी संतप्त झालेले पाहून पंचायत सदस्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात याची माहिती दिली.  याप्रकरणी पोलिसांनी चौकशीचा आदेश देण्यात आला असून दोषी आढळल्यास मुख्याध्यापकावर कठोर कारवाई करण्याचे आश्‍वासनही दिले.