कोल्हापूर, ३ जून (वार्ता.) – ‘मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठान’च्या वतीने ६ जून या दिवशी विशाळगड येथे शिवराज्याभिषेकदिनाचा सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्याला श्रीमंत सरदार रायाजी बांदल देशमुख यांचे वंशज श्री. तुषार बांदल-देशमुख, श्री. प्रथमेश बांदल-देशमुख, श्री. राजेंद्र बांदल-देशमुख, श्री. आदित्य बांदल-देशमुख, श्री. वैभव बांदल-देशमुख, तसेच राजेश्री आणि प्रतिक्षा बांदल-देशमुख, जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज श्री. शिरीष मोरेगुरुजी, नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांचे वंशज श्री. संदेश देशपांडे, इतिहास संशोधक मंडळाचे आजीव सदस्य श्री. बालाजी काशीद, इतिहास अभ्यासक श्री. रोहित पेरे-पाटील उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती ‘मराठा तितुका मेळवावा संघटने’चे अध्यक्ष रणजित घरपणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. घरपणकर पुढे म्हणाले, ‘‘शिवराज्याभिषेकदिनाचे कार्यक्रम रविवार, ५ जूनपासून चालू होतील. यात दुपारी २ वाजता पानवखिंड पूजन, दुपारी ३ वाजता मुंडाद्वार येथे ध्वजारोहण आणि गडपूजन, दुपारी ४ वाजता वृक्षारोपण, तसेच सायंकाळी ७ वाजता मान्यवरांचे व्याख्यान होईल. ६ जून या दिवशी सकाळी ८ वाजता श्री. शिरीष मोरेगुरुजी, श्री. बालाजी काशीद, तसेच मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन होईल. सकाळी ८ ते ९ या वेळेत क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाडा यांचे शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक होईल. मुख्य कार्यक्रम भगवंतेश्वर मंदिर येथे सकाळी ९ ते १० या वेळेत शिवराज्याभिषेक पूजेचा होईल, ज्यात पवित्र गंगानदीचे जल आणि दुग्धाभिषेक यांनी उत्सवमूर्तीची विधीवत् पूजा होईल.
सकाळी १०.३० ते सकाळी ११.३० या वेळेत उपस्थित प्रमुख पाहुणे आणि निमंत्रित यांचे व्याख्यान, मार्गदर्शन, मनोगत होईल. यानंतर सगळ्यात शेवटी दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसाद होईल. तरी अधिकाधिक शिवभक्तांनी सोहळ्यासाठी उपस्थित रहावे.’’