गेल्या जवळपास काही मासांपासून काशी विश्वनाथ आणि ज्ञानवापी मशीद यांचे नाव चर्चेत आहे. वाराणसीत असलेल्या मूळ काशी विश्वेश्वराची ही जागा मोगल काळात बाटवली गेली आणि मंदिर पाडून मशीद झाली, असे हे प्रकरण आहे. अर्थात् या प्रकरणाशी महाराष्ट्राचा संबंध फार जवळचा आहे, हे बऱ्याच मराठीजनांना ठाऊकही नसेल. म्हणूनच ज्ञानवापीचे प्रकरण काय आहे, ते थोडक्यात पाहू.
१. स्कंद पुराणात आणि सम्राट गुप्त कालखंडात काशीचा उल्लेख आढळणे
काशीचा विश्वेश्वर म्हणजे हिंदु धर्मियांचे अतिशय मानाचे श्रद्धास्थान ! काशीचा जुन्यातला जुना उल्लेख स्कंद पुराणांतर्गत असलेल्या १०० अध्यायांच्या काशी खंडात येतो. स्कंद पुराणाचा लेखनकाल निश्चित करता येत नसला, तरीही तो गुप्तांच्या कारकीर्दीच्या आधीच असल्याचे दिसून येते. सम्राट गुप्त कालखंडात मात्र काशी विश्वेश्वराचे रूप अतिशय भव्य आणि उत्तुंग होते, असे तत्कालीन वर्णनावरून दिसून येते.
२. चिनी प्रवासी ह्युएन त्संग यांनी केलेल्या नोंदींमध्ये विश्वेश्वराच्या मंदिराचा उल्लेख आढळणे
ह्युएन त्संग नावाचा एक चिनी प्रवासी याच कालखंडात भारताच्या दौऱ्यावर असतांना त्याने वाराणसीविषयी काही नोंदी केल्या आहेत. तो लिहितो, ‘राजधानी (काशी) हे एक दाट लोकवस्तीचे शहर आहे. येथील कुटुंबे पुष्कळ श्रीमंत आहेत. लोकांचा स्वभाव मृदू आणि माणुसकी असलेला आहे. इथल्या लोकांना ज्ञानार्जनासाठी पुष्कळ दान दिले जाते.’ ह्युएन त्संग यांनी विश्वेश्वराचे मंदिर किती भव्य आहे, त्याविषयीही काही नोंदी केल्या आहेत.
३. महंमद घोरीचा सेनापती कुतुबुद्दीन ऐबक याने काशी विश्वेश्वरावर पहिल्यांदा आक्रमण करणे
गुप्तकाल हा मध्ययुगीन भारतातील हिंदुत्वाचा एक सुवर्णकाळ मानला जातो. सम्राट गुप्तांची राजवट संपली, तरी धर्माचा प्रभाव कळसाला पोचला असतांनाच पश्चिमेकडून सिंध प्रांतावर बिन कासीमच्या निमित्ताने पहिले परकीय आक्रमण झाले आणि हळूहळू या सगळ्या धार्मिक परंपरेवर काळ्याकुट्ट ढगांचे सावट येऊ लागले. या मधल्या काळात काशीच्या विश्वेश्वरावर दोनदा आक्रमण झाले. पहिले आक्रमण बारावे शतक संपत असतांना झाले. देहलीच्या सिंहासनावर बसलेल्या महंमद घोरीचा सेनापती कुतुबुद्दीन ऐबक याने कनौजचा सर्व प्रांत जिंकून घेतला आणि याच गोंधळात विश्वेश्वराच्या मंदिराला तोशीस (त्रास) लागली. जवळपास सहस्र मंदिरे फुटली, तिथे मशिदी उभ्या राहिल्या.
४. बादशाह अल्तमशच्या काळात एका व्यापाऱ्याने विश्वेश्वराचे मंदिर पुन्हा बांधणे आणि इब्राहिम लोधीच्या काळात मंदिर पाडून तेथे मशीद उभारणे
वाराणसी हे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याने तिथे गाझी सैन्याने काय धुमाकूळ घातला, हे घोरीच्या दरबारातील हसन निझामी याने लिहिलेल्या ‘ताज-उल्-मासिर’मध्ये वाचायला मिळते. याचा अनुवाद एलियट आणि डॉसनच्या दुसऱ्या खंडात वाचायला मिळेल. पुढे ५० वर्षांनंतर बादशाह अल्तमशच्या कारकीर्दीत एका व्यापाऱ्याने हे मंदिर पुन्हा पूर्ववत् केले. या सगळ्याला २०० वर्षे उलटतात न उलटतात, तोच इब्राहिम लोधीच्या कारकीर्दीत पुन्हा विश्वेश्वरावर धाड आली आणि मंदिर उद्ध्वस्त होऊन तिथे मशीद उभी राहिली. ती मशीद पुढची जवळपास १००-१२५ वर्षे अशीच उभी होती. येथून पुढे काशी विश्वेश्वराशी महाराष्ट्राचा थेट संबंध चालू होतो.
५. प्रकांड मराठी धर्मपंडित नारायण भट्ट यांनी काशी विश्वेश्वराचे मंदिर पुन्हा उभारणे
लोधी राजवटीत नष्ट झालेले काशी विश्वेश्वराचे मंदिर पुन्हा उभारण्याचा निश्चय केला तो एका प्रकांड मराठी धर्मपंडिताने ! नारायण भट्ट हे त्यांचे नाव. नारायण भट्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करणाऱ्या गागा भट्ट यांचे पणजोबा. मूळचे पैठणचे असलेले हे भट्ट काशीत तेव्हापासून स्थायिक झाले आणि पुढे गागा भट्ट काशीहून महाराजांना राज्याभिषेक करण्यासाठी महाराष्ट्रात आले. नारायण भट्ट यांनी उभे केलेले हे मंदिर कसे होते, याविषयी आपल्याकडे उल्लेख आहेत. (क्रमश:)
– कौस्तुभ कस्तुरे (साभार : फेसबूक)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/584519.html
संपादकीय भूमिकाकाशी विश्वेश्वराच्या मंदिरावर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी आणि त्याला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य ! |