सोलापूर, २ मार्च (वार्ता.) – सोलापूर शहर गोहत्यामुक्त व्हावे यासाठी महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या वेळी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदू राष्ट्रसेना, जगदंब सामाजिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था, एल्.आर्.जी. प्रतिष्ठान सोलापूर, स्वराज्य प्रतिष्ठान आणि गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी कार्यकर्त्यांनी हातामध्ये प्रबोधनपर फलक घेतले होते. त्यावर ‘गोहत्या मुक्त सोलापूर बनवू, हीच भगवान सिद्धेश्वरांची खरी पूजा’, ‘गाय वाचवा, सिद्धेश्वरांची शान वाढवा !’, ‘श्री सिद्धेश्वरांच्या पवित्र नगरित गोहत्या करणार्याला कठोर शासन व्हावे !’, या मागण्या फलकावर लिहिण्यात आल्या होत्या.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वश्री केतन शहा, विजय यादव, अंबादास गोरंटला, प्रमोद चिंचोरे, सिद्धू चिरकुपल्ली, मल्लिकार्जुन पाटील, सतीश सिरसिल्ला, शीतल परदेशी, रवि गोणे यांसह अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. ‘सोलापूर येथे २०० हून अधिक अवैध पशूवधगृहे चालू आहेत. गोवंशहत्या बंदी कायदा असूनही शहरात प्रतिदिन ७०० ते ८०० गायी कापल्या जातात, त्यामुळे प्रत्येक हिंदूने गाय वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत’, असे मत विजय रामचंद्र यादव यांनी या वेळी मांडले.