सांगली – माधवनगर येथील मारुति मंदिरात मूर्तीची विटंबना झाली असून यामुळे हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ही घटना म्हणजे केवळ मूर्तीच्या पवित्रतेवर आक्रमण नसून हिंदु समाजाची अस्मिता, श्रद्धा यांवर केलेला गंभीर घाव आहे. अशा घटनांमुळे समाजात अस्थिरता निर्माण होते. या घटनेचे सखोल अन्वेषण करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मंदिर आणि धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी विशेष पावले उचलावीत, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने पोलीस ठाण्यात देण्यात आले. (अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ? – संपादक) या प्रसंगी सकल हिंदु समाजाचे श्री. विनायक येडके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उमाकांत नार्वेकर, बजरंग दलाचे श्री. आकाश जाधव, श्री. राजेश चव्हाण यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.