छत्तीसगड येथे नाताळच्या दिवशी २५० ख्रिस्ती कुटुंबातील ६०० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

जशपूर (छत्तीसगड) – येथील पत्थलगावातील किलकिला धाममध्ये आर्य समाजाकडून आयोजित करण्यात आलेल्या ३ दिवसीय कार्यक्रमामध्ये २५० कुटुंबातील ६०० ख्रिस्त्यांनी २५ डिसेंबर या नाताळच्या दिवशी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. राज्यातील भाजप सरकारमधील मंत्री प्रबल प्रताप सिंह जूदेव यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. त्यांनी या लोकांचे पाय धुवून त्यांचे हिंदु धर्मात स्वागत केले. या वेळी महायज्ञ आणि भंडारा यांचेही आयोजन करण्यात आले होते.

१. प्रबल प्रताप सिंह जूदेव यांनी या वेळी सांगितले, ‘धर्माच्या रक्षणासाठी सर्वांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे. काही लोक धर्मांतराच्या माध्यमातून हिंदूंना दुर्बल करण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र अशा लोकांना उत्तर देण्यासाठी हिंदू जागे होत आहेत आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी काम करू लागले आहेत.’

२. हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केलेल्या हिंदूंनी सांगितले, ‘आमच्या पूर्वजांनी काही कारणांमुळे त्या वेळी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. आता आम्हाला पुन्हा हिंदु धर्मात येण्याची संधी मिळाली असल्याने आम्ही पुन्हा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करत आहोत.’

३. यापूर्वी पत्थलगावच्या खूँटापानी भागामध्ये ४०० कुटुंबातील १ सहस्र २०० लोकांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला होता. त्या वेळीही मंत्री प्रबल प्रताप सिंह जूदेव उपस्थित होते. ‘आतापर्यंत १० सहस्र लोकांना हिंदु धर्मांत आणण्यात आले आहे’, अशी माहिती जूदेव यांनी यापूर्वी दिली होती.