समास : शब्दांची बचत करणारी व्यवस्था !

सनातनचे अध्यात्मावर आधारित मराठी व्याकरण !

कु. सुप्रिया नवरंगे

‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’ प्राचीन काळी देवभाषा संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे सहस्रो वर्षांचा काळ लोटल्यावर संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी अनेक भाषांची निर्मिती झाली. कालांतराने या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र या व्याकरणाचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असण्ो अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे स्वतःची मातृभाषा धड न येणार्‍या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे फार अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. आजच्या लेखात आपण ‘बहुव्रिही समास’ आणि ‘सामासिक शब्द लिहिण्याची पद्धत’, यांविषयी जाणून घेऊ.

(लेखांक ६ – भाग ४)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/529159.html

९. सामासिक शब्दातील दोन्ही शब्द महत्त्वाचे नसतील आणि त्या दोन शब्दांवरून तिसर्‍याच अर्थाचा बोध होत असेल, तर त्यास ‘बहुव्रिही समास’ असे म्हणत असणे !

‘भालचंद्र’ या सामासिक शब्दामध्ये ‘भाल’ (मराठीमध्ये ‘भाळ’), म्हणजे कपाळ आणि ‘चंद्र’ हे दोन शब्द आहेत; परंतु हा जोडशब्द उच्चारतांना आपल्याला ‘भाळा’विषयी (कपाळाविषयी) बोलायचे नसते, तसेच ‘चंद्रा’विषयीही बोलायचे नसते, तर ‘ज्याच्या भाळावर चंद्र आहे, अशा शंकरा’विषयी आपण बोलत असतो. याचा अर्थ, ‘या शब्दामध्ये ‘भाल’ आणि ‘चंद्र’ या दोन्ही शब्दांना महत्त्व नसून या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून ‘शंकर’ या तिसर्‍याच अर्थाचा बोध होतो.’ अशा प्रकारच्या समासाला ‘बहुव्रिही समास’ असे म्हणतात. याची आणखी काही उदाहरणे आणि ती सुलभतेने कळावीत, यासाठी त्यांचे विग्रह पुढे दिले आहेत.

१०. सामासिक शब्द लिहिण्याची पद्धत

आतापर्यंत आपण समासाच्या प्रकारांची अगदी अल्पशी ओळख करून घेतली. आता ‘सामासिक शब्द व्याकरणदृष्ट्या कसे लिहावेत ?’, हे जाणून घेऊ.

१० अ. लक्ष्मीपुत्र : या सामासिक शब्दात ‘लक्ष्मी’ आणि ‘पुत्र’ असे दोन शब्द आहेत. या शब्दांतील पहिला शब्द ‘लक्ष्मी’ हा मुळात तत्सम (संस्कृतमधून जसाच्या तसा मराठीत आलेला) आणि दीर्घ ई-कारांत आहे, म्हणजे या शब्दाच्या शेवटच्या ‘क्ष्मी’ या अक्षरामध्ये दीर्घ ‘ई’ अंतर्भूत आहे. असा शब्द सामासिक शब्दातील पहिला शब्द म्हणून लिहितांना त्याचे शेवटचे अक्षर मुळात जसे आहे, त्याप्रमाणे दीर्घच लिहावे.

१० अ १. नियम – सामासिक शब्दातील पहिला शब्द तत्सम आणि दीर्घ ई-कारांत किंवा ऊ-कारांत असेल, तर समास होतांना त्या पहिल्या शब्दाचे शेवटचे अक्षर दीर्घच लिहावे !

१० अ २. या नियमाची आणखी काही उदाहरणे आणि ती सुलभतेने कळण्यासाठी त्यांचे विग्रह पुढे दिले आहेत.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– कु. सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१०.२०२१)