मुंबई, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – अन्याय झालेल्या महिलेला त्या धक्क्यातून लवकर बाहेर काढण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न असायला हवेत; मात्र त्या प्रसंगाविषयी सातत्याने करण्यात येणार्या चौकशीमुळे पीडित महिलेचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते. अत्याचाराची सतत आठवण करून देणे म्हणजे पीडित महिलेची एकप्रकारे मानहानी आहे. असे होऊ नये, यासाठी राज्यात ‘वन स्टॉप प्लेस’ अशी कार्यपद्धती राबवण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली. सौ. रूपाली चाकणकर यांनी नुकतीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी धुरा हाती घेतली आहे. त्यानंतर त्यांनी तत्परतेने महिलांची मानहानी रोखण्यासाठी ही महत्त्वाची कार्यपद्धती राज्यात लागू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू केले आहेत.
पत्रकारांशी बोलतांना सौ. रूपाली चाकणकर म्हणाल्या, ‘‘अत्याचाराची चौकशी करण्यासाठी पीडित महिलेला वारंवार पोलीस चौकशीला सामोरे जावे लागते. ही चौकशीची प्रक्रिया अनेक मास चालते. ही चौकशी एका आठवड्यात पूर्ण व्हावी, यासाठी ‘वन स्टॉप प्लेस’ ही योजना राबवण्यात येणार आहे. यामुळे अत्याचाराच्या प्रसंगातून लवकर बाहेर पडून त्या महिलेला तिचे जीवन नव्याने चालू करता येईल. याविषयी महिलांची समिती स्थापन करणे, हे खटले जलदगती न्यायालयात चालवणे आदींविषयी सविस्तर धोरण लवकरच घोषित करणार आहोत. बालविवाह रोखणे, तसेच खासगी किंवा शासकीय कार्यालयांमध्ये महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महिलांची नोंदणीकृत समिती स्थापन करण्याच्या दृष्टीनेही आयोगाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत.’’