बलीदान व्यर्थ न ठरो !

संपादकीय

वारंवार होणारी आतंकवादी आक्रमणे, हे काँग्रेसच्या पाकधार्जिण्या धोरणांचे फलित !

माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते ‘वीरचक्र’ हा पुरस्कार स्वीकारताना अभिनंदन बर्धमान

२२ नोव्हेंबर या दिवशी नवी देहली येथे सैन्याचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. बालाकोट येथे ‘एअर स्ट्राईक’ करून पाकचे फायटर जेट (लढाऊ विमान) पाडणारे अभिनंदन बर्धमान यांचा ‘वीरचक्र’ हा ३ रा सर्वाेच्च पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्याचसमवेत सैन्यातील अधिकारी आणि निवृत्त अधिकारी यांनाही विशेष सन्मान देऊन गौरवण्यात आले. देशासाठी पराक्रम गाजवून परतलेला सैनिक हा प्रत्येक भारतियासाठी अत्यंत अभिमानाचा आणि त्याच्यातील वीरश्री वृद्धींगत करणारा विषय असतो. दिवसरात्र देशाच्या सीमांचे रक्षण करणार्‍या आणि ज्यांच्यामुळे आपण आपल्या कुटुंबासमवेत सुखाने राहू शकत आहोत, अशा देशाच्या सैनिकांचा सन्मान सोहळा म्हणजे सामान्य देशप्रेमी जनतेच्या राष्ट्राप्रतीच्या सर्व भावना उचंबळून येण्याचा क्षण असतो. या सोहळ्यात मरणोत्तर पुरस्कारही देण्यात येतात. यंदाही ते देण्यात आले. कट्टर आतंकवाद्याला मारणारे सुभेदार सोमबीर, ५ आतंकवाद्यांना मारून त्यांच्याकडून २०० किलो विस्फोटक घेणारे मेजर विभूती ढोंडियाल, आतंकवाद्यांशी लढतांना धारातीर्थी पडलेले अभियंते प्रकाश जाधव यांचा यात समावेश होता. त्यांच्या पत्नी आणि माता यांनी निर्विकार चेहर्‍याने हे पुरस्कार स्वीकारले. राष्ट्रासाठी निःस्वार्थीपणे प्राणांचे बलीदान करणारे क्रांतीवीर आणि धारातीर्थी पडलेले सैनिक हे नेहमीच देशातील जनतेला अन् पुढील पिढीला लढण्याची प्रेरणा देतात. दीड सहस्र वर्षे विविध शत्रूंनी आक्रमणे करून भारताला बेजार करून सोडले; परंतु आजही भारतवर्ष अबाधित आहे; त्यामागे येथील शूरविरांचे बलीदान कामी आले. अर्थात्च त्यामुळे हे वीरपुरुष भारतीय जनतेसाठी अजरामर आणि प्रेरक झाले आहेत अन् ‘त्यांचे बलीदान सार्थ ठरले’, अशीही समाधानाची भावना जनतेत आहे. पूर्वी भारतात अनेक हिंदु राजे स्वतंत्रपणे लढत होते आणि मोगल शत्रूला तोंड देत होते. आता एकसंघ स्वतंत्र आणि बलाढ्य भारत राष्ट्र उभे आहे; परंतु स्वातंत्र्यापासून आजपर्यंत देशाच्या सीमाभागात केवळ आणि केवळ पाकसारख्या आतंकवादी पोसणार्‍या शत्रूराष्ट्रामुळे त्याच्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत कित्येक पटींनी सरस असूनही, भारतीय सैनिक हकनाक बळी पडत आहेत. पूर्वी काँग्रेस सरकार शांततेच्या चर्चा करत राहिले आणि आतंकवादी काश्मीर बळकावत राहिले. सैनिकांना बुटांसारखे अत्यावश्यक साहित्य देण्याकडेही सरकारने लक्ष दिले नाही. तुलनेत मोदी शासन आल्यापासून तिन्ही सैन्य दलांत अनेक महत्त्वाच्या सुधारणा झाल्या आणि होत आहेत. देशाच्या सीमा बंद करण्याचे सर्वांत मोठे आव्हान मोदी शासनाने स्वीकारले.

येत्या काळातील युद्धाचे वारे पहाता विविध प्रकारची नवनवीन युद्धविमाने, पाणबुड्या अनुक्रमे वायूदल आणि नौदल येथे समाविष्ट होत आहेत. सैन्य दिवसेंदिवस अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज होत आहे. ‘मेक इन इंडिया’च्या अभियानाअंतर्गत स्वदेशी बनावटीचे रणगाडे आणि शस्त्रास्त्रे बनत आहेत. क्षेपणास्त्रांची निर्मिती आणि खरेदी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे मोदी शासनाने दोन ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे आतंकवादी पुरस्कृत दगडफेक्यांचाही बंदोबस्त झाला आहे. प्रत्येक दिवाळीला पंतप्रधान स्वतः सैनिकांना भेटून त्यांना लढण्यासाठी बळ देऊन त्यांचा उत्साह द्विगुणित करतात. ‘सैन्याला निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत; त्यांचे हात बांधलेले नाहीत’, असे संरक्षणमंत्री अधून मधून सांगत असतात. सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे काश्मीरमध्ये ‘कलम ३७०’ रहित केल्याने आणि तिथे विकासाच्या योजना चालू झाल्याने आतंकवाद्यांचा जळफळाट होत आहे. एवढे सगळे असूनही आतंकवादी आक्रमणे मात्र थांबलेली नाहीत आणि त्यांच्या छुप्या आक्रमणांना प्रतिकार करतांना भारताच्या सैनिकांचे धारातीर्थी पडणेही थांबलेले नाही. याचाच अर्थ आतंकवाद्यांचा कारखाना जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत सर्वतोपरी कितीही उपाययोजना केल्या, तरी त्या अपुर्‍याच पडत आहेत. त्यामुळे ‘भारत सैनिकीदृृष्ट्या पाकच्या कित्येक पटींनी वरचढ असूनही अजून किती दिवस सैनिकांचे हकनाक बळी जाणार आणि किती दिवस त्यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करावे लागणार ?’, असा प्रश्न निर्माण होत आहे.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेतल्यावर आतंकवादी आक्रमणे थांबणार ?

नुकतेच पाकच्या संसदेत तेथील ‘मुस्लिम लीग एन्’ या पक्षाचे नेते अयाज सादिक यांनी सांगितले, ‘‘विदेशमंत्री कुरेशी यांनी एका महत्त्वाच्या बैठकीत मान्य केले, ‘जर अभिनंदन यांना सोडले नसते, तर त्या रात्री ९ पर्यंत भारताने आक्रमण केले असते.’ त्या वेळी त्यांचे सैन्यप्रमुख बाजवा यांना प्रचंड घाम फुटून त्यांचे पाय लटपटत होते आणि बैठकीला यायला पंतप्रधान इम्रान खान यांनी नकार दिला होता.’’ भारत अभिनंदन यांना परत आणण्याच्या कूटनीतीत तरी पूर्ण यशस्वी ठरला. अभिनंदन यांच्याप्रमाणेच लढणार्‍या प्रत्येक सैनिकाचा जीव तेवढाच महत्त्वाचा असतांना आतंकवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी भारताने त्याची क्षमता सिद्ध करण्याची वेळ आली आहे. सैन्याला पुरस्कार देण्याचा सोहळा साजरा होत असतांनाच देहली येथे ‘मीरपूर बलीदान दिवस’ साजरा करण्याच्या अन्य एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ‘पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेणार’, अशी मोठी घोषणा केली. आतंकवाद्यांचे बहुतांश तळ हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत. त्यामुळे ‘पाकव्याप्त काश्मीर भारताच्या कह्यात आल्यावर भारतावर होणारी आक्रमणे काही प्रमाणात तरी थांबतील’ अशी आशा आहे. अडीच सहस्र वेळा पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारताने ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. अजून किती आतंकवादी आक्रमणे झाल्यावर आणि किती सैनिक धारातीर्थी पडल्यावर आतंकवाद्यांची घुसखोरी भारतात बंद होण्याची ठोस उपाययोजना निघणार आहे ? भारतियांनाही त्यांच्या वीर सैनिकांचा गौरव पुनःपुन्हा पहायचा आहे आणि त्यांची वीरगाथा गायची आहे; परंतु आतंकवाद्यांच्या भ्याड आक्रमणांमुळे धारातीर्थी पडावे लागलेल्या सैनिकांचा नव्हे ! त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेऊन आतंकवाद्यांना भारतापासून कायमचे दूर ठेवण्याचा ‘मास्टर स्ट्रोक’ पंतप्रधान मोदी मारतील का ? हे पहाण्याची प्रतीक्षा मात्र आता देशप्रेमींना आहे !